मुंबई : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाबाहेर जावून काहीही करणार नाही, असे परखड मतप्रदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले. कायद्याच्या चौकटीबाहेर जावून आरक्षण दिल्यास ते टिकणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षणाच्या मागणीसह अन्य मुद्द्यावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी फडणवीस यांनी जरांगे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर परखड भाष्य केले आहे.
मला कोणीही कितीही शिव्या दिल्या, तरी जे समाजाच्या हिताचे आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने सांगितले आहे, त्याबाहेर मी जाऊ शकत नाही. मराठा समाजाचा ओबीसीत सरसकट समावेश करावा, अशी मागणी केली जात आहे. पण यासंदर्भात सर्वोच्च व उच्च न्यायालयाने काही निर्णय दिले आहेत. या निर्णयांचा आपल्याला अवमान करता येणार नाही, असे फडणवीस यांनी नमूद केले.
जरांगेंना कोणता मुद्दा पटेल किंवा नाही, हे मला सांगता येणार नाही. मला त्यांच्या मनात शिरता आले असते, तर आझाद मैदानावरील आंदोलनच संपले असते आणि आरक्षणाचा प्रश्न आतापर्यंत सुटला असता, अशी खोचक टिप्पणी फडणवीस यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केली.
जरांगे हे फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करीत आहेत. त्याबाबत फडणवीस म्हणाले, मला आनंद आहे. मला उपहास सहन करणे व शिव्या खाणे, याची सवय आहे. माझ्यावर याचा काहीही परिणाम होत नाही. शेवटी आपल्या कर्तृत्त्वाने इतिहासात नोंद होते व लोक लक्षात ठेवतात. आपले कर्तृत्व काय आहे, हे महत्त्वाचे आहे.
मराठा समाजाच्या हिताचेच निर्णय घेतले
महायुती सरकारने नेहमीच मराठा समाजाच्या हिताचेच निर्णय घेतले आहेत. माझ्या आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण दिले गेले. मराठा समाज या आरक्षणाचा लाभ घेत आहे. जरांगे पाटील आज ज्या मागण्या करीत आहेत, त्याकडे आम्ही सकारात्मकतेनेच पहात आहोत, असे फडणवीस यांनी नमूद केले.
हुल्लडबाजी योग्य नाही
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे आझाद मैदानावर गेल्या असताना हुल्लडबाजी झाली. ती योग्य नसल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. कोणीही नेता तेथे गेल्यास योग्य वागणूक मिळाली पाहिजे. घोषणाबाजी किंवा बाटल्या फेकणे, योग्य नाही. हुल्लडबाजी करून काहीच मिळणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.