CM Devendra Fadnavis On Dadar Kabutarkhana Protest : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील कबुतरखाने हा मुद्दा चर्चेत आहे. यातच आज (६ ऑगस्ट) सकाळी मुंबईमधील दादर परिसरात कबुतरप्रेमींनी आंदोलन केलं. त्यामुळे दादर परिसरात असलेल्या कबुतरखान्याजवळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने सर्व कबुतरखाने बंद करत त्यावर ताडपत्री टाकली होती. पण आज कबुतरप्रेमींनी दादर परिसरातील कबुतरखान्याजवळ एकत्र येत आंदोलन करत तेथील ताडपत्री फाडून आत प्रवेश केला.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे आस्था आणि लोकभावना आहे. तसेच दुसरीकडे लोकांचं आरोग्य देखील आहे. त्यामुळे या दोघांची सांगड घालून योग्य तो मार्ग काढण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“मला असं वाटतं की एकीकडे आस्था आहे, लोकभावना आहे. तसेच दुसरीकडे लोकांचं आरोग्य देखील आहे. या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल. त्यामुळे लोकभावना आणि धार्मिक भावना जपण्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काय करता येईल? त्यामधून कुठेही आरोग्याला धोका निर्माण होणार नाही, अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. यावर मार्ग काढण्यासाठी काही मार्ग आम्हाला सुचलेले आहेत. आम्ही ते न्यायालयासमोर मांडणार आहोत. जेणेकरून एवढ्या वर्षांची जी परंपरा आहे, ही खंडीत होणार नाही आणि आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दादरच्या कबुतरखान्याजवळ राडा

दादर येथील कबुतरखान्यावर आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येनं आंदोलक जमले. त्यांनी तेथील कबुतरखान्यावर टाकण्यात आलेली ताडपत्री फाडली. काही यानंतर आंदोलक आत शिरले व त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना अडवून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतरही आंदोलकांनी आतमध्ये शिरून राडा घालायला सुरुवात केली. त्याचबरोबर सोबत आणलेलं कबुतरांसाठीचं खाद्यदेखील त्यांनी तिथे पसरवून टाकलं.

अजित पवारांची काय भूमिका मांडली?

“देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला मंगलप्रभात लोढाही होते. दादर कबुतरखान्याशी संबंधित एक संघटना आहे. त्या संघटनेचेही सदस्य होते. यातून मार्ग निघावा अशी सकारात्मक भूमिका मुख्यमंत्र्यांनी त्यात घेतली होती. त्यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनाही बोलवून घेतलं होतं. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गगराणींनाही काही सूचना दिल्या. या कबुतरांचं एकदमच खाणं बंद करणं चुकीचं ठरेल या अनुषंगाने संजय गांधी उद्यान व इतर बिगर रहिवासी मोकळ्या जागी त्यांच्या खाद्याची व्यवस्था करण्यासंदर्भात विचार मांडण्यात आला होता”, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दादरमधील आंदोलनाबाबत बोलताना दिली.