राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवरील जाहिरातीवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात सडकून टीका केली. एसटी बसेसच्या फुटलेल्या काचांचे फोटो दाखवत ही कसली दळभद्री बस आणि त्यावरील जाहिरात, अशी बोचरी टीका अजित पवारांनी केली. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं. ते शुक्रवारी (३ मार्च) विधानसभेच्या अधिवेशनात बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “आधी एकच जाहिरात होती की, ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’. मात्र, तो विषय जाऊ द्या. आता ‘आमचा महाराष्ट्र, गतिमान महाराष्ट्र’ असं आमचं ब्रिदवाक्य आहे. संपूर्ण महाराष्ट्र आपला आहे.” यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत शिंदे-फडणवीस सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचा मुद्दा उपस्थित केला.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

अजित पवार म्हणाले होते, “शिंदे-फडणवीस सरकारने कोट्यावधींच्या जाहिराती मागील सहा महिन्यात दिल्या. १७ कोटीहून अधिक रक्कम महानगरपालिकेच्या जाहिरातीवर खर्च केली.”

हेही वाचा : फुटक्या काचाच्या बसवर शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात अधिवेशनात झळकल्यानंतर कर्मचारी निलंबित, अजित पवार म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ही कसली दळभद्री बस आणि त्यावरील जाहिरात”

“एसटी बसेसवरील जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो आहे. ‘वर्तमान सरकार, भविष्यात आकार, योजना दमदार, जनतेचे हे सरकार’ अशी घोषणा जाहिरातीत आहे. मात्र, ज्या बसवर ही जाहिरात लावलीय ती बस प्रचंड दळभद्री आहे. त्या बसच्या काचा फुटल्या आहेत. अरे कशाला असले धंदे करता,” अशी टीका अजित पवार यांनी केली होती.