मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी जमाव हिंसक होऊन जाळपोळ करत असल्याचं समोर येत आहे. मनोज जरांगेंकडून ही जाळपोळ मराठा समाजाकडून होत नसून यामागे दुसरेच कुणीतरी असल्याबाबत शंका व्यक्त केली आहे. दुसरीकडे या जाळपोळीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. तसेच आंदोलनाला गालबोट लागेल अशी कृती कुणी करू नये, असं आवाहन केलं. ते मंगळवारी (३१ ऑक्टोबर) मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “जो अहवाल मिळाला तो प्रथम अहवाल आहे. त्यात १३ हजार ५०० कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्याचा मराठा समाजाला नक्की होईल. मनोज जरांगेंशी माझं बोलणं झालं. त्यांची जशी मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आहे, तशी सरकारचीही भूमिका आहे. मी ती भूमिका जाहीरपणे सांगितली आहे. त्याला थोडा वेळ दिला पाहिजे. त्यामुळे टोकाचं पाऊल उचलून आंदोलनाला गालबोट लागेल अशी कृती कुणी करू नये, असं आवाहन मी सकल मराठा समाजाला करतो.”

“लाखांचे ५८ मोर्चे निघाले, पण हिंसा नाही”

“मराठा समाज हा शांतताप्रिय आणि शिस्तप्रिय आहे. गेल्यावेळी लाखा-लाखांचे ५८ मोर्चे निघाले होते. लाखो लोक एकत्र आले, पण कुठेही हिंसात्मक आंदोलन झालं नाही. ही आंदोलनं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि मी समितीत होतो. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं होतं,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आंदोलनाला गालबोट लागेल असं वर्तन नको”

“मराठा समाजाला आवाहन आहे की, आपल्या आंदोलनाला गालबोट लागेल किंवा हिंसात्मक आंदोलन होईल अशाप्रकारचं वर्तन करू नका. शिस्तबद्धपणे आंदोलन करण्याच्या आपल्या परंपरेला कुठेही गालबोट लागेल असं कृत्य कुणाकडूनही होऊ नये. अशी माझी भावना आहे आणि मनोज जरांगेंनीही मराठा समाजाला तसं आवाहन केलं आहे. यापुढेही त्यांनी हे आवाहन करावं. त्यांनी त्यांच्या तब्येतीचीही काळजी घ्यावी. सरकारला त्याचीही काळजी आहे,” असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.