मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याची मुंबईकरांना सवय झाल्याची नेहमी चर्चा केली जाते. मात्र, दरवर्षीच्या पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर यंदाच्या पहिल्याच पावसात मुंबईतील मिलन सब-वेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले. शनिवारी रात्री झालेल्या पावसात मिलन सब-वे पाण्याखाली गेल्यामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर आज सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलन सब-वेची पाहणी केली.

शनिवारी रात्री मुंबईत एका तासात ७० मिलिमीटर पाऊस पडल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये दिली. मात्र, असं असलं, तरी मिलन सब-वेप्रमाणेच मुंबईत इतर ठिकाणीही यंत्रणा कार्यान्वित केल्यास मुंबईकरांना पावसाळ्यात त्रास होणार नाही, असं प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“मिलन सब-वेमध्ये लावलेली यंत्रणा काम करतेय का? हे पाहायला मी आज आलो. मिलन सब-वेमधली वाहतूक चालू आहे. सब-वेमध्ये पाणी साचल्यानंतर ते पाणी पंपिंगनं बाजूच्या नाल्यात सोडलं जातंय. त्यानंतर ते पाणी तिथून थेट मोठ्या टँकमध्ये सोडलं जातंय. अशी यंत्रणा इथे लावण्यात आली आहे. फ्लडगेटही लावले आहेत. त्यामुळे भरती येईल तेव्हा फ्लडगेटमुळे पाणी आत येणार नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ही व्यवस्था नीट काम करते आहे. त्यामुळेच मिलन सब-वेमधली वाहतूक व्यवस्थित चालू आहे. यासंदर्भातल्या सूचना मी आयुक्तांना दिल्या आहेत. पाणी साचण्याची जेवढी ठिकाणं आहेत, त्या सर्व ठिकाणी अशीच प्रणाली राबवण्याचे आदेश मी दिले आहेत. असं केलं, तर पावसाळ्यात लोकांना त्रास होणार नाही. अशी यंत्रणा अंधेरी आणि इतर ठिकाणीही आपण लावतोय”, असंही एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितलं.