राजकीय भेटीगाठी महाराष्ट्राला नव्या नाहीत. पण आज मुंबईत एक व्हीआयपी भेट पार पडली. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. आज ते मुंबईत आले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. मुंबईतील आलिशान ट्रायडेंट हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो मुख्यमंत्री कार्यालयाच्या एक्स हँडलवर (ट्विटर) पोस्ट करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी भूतानचे राजे वांगचूक यांचं पारंपरिक भारतीय पद्धतीने स्वागत करताना त्यांना शाल, पुष्पगुच्छ, श्रीगणेशाची मूर्ती व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट म्हणून देत त्यांना सन्मानित केलं.
या भेटीच्या वेळी भूतानचे राजे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यादरम्यान चर्चाही झाली. “भारत व भूतान या दोन देशांची संस्कृती व परंपरा यांच्यात बरेच साम्य आहे. एकमेकांच्या वेगवेगळ्या क्षेत्रात परस्पर सहकार्य करून या दोन्ही देशांमधील संबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीसंदर्भात दिली.