पक्षाने मुख्यमंत्रीपद नाकारल्याने अस्वस्थ झालेल्या एकनाथ उर्फ नाथाभाऊ खडसे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने भाजप सरकारची पंचाईत होऊ लागली. खडसे यांच्या वेगाने पळणाऱ्या गाडीला अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ब्रेक लावावा लागला. मुद्दयाला सोडून बोलू नये, असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी नाथाभाऊंना ‘जरा दमानं’ घ्या, असा सल्ला गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिला. ज्येष्ठ मंत्र्यांना चाप लावल्याने फडणवीस खऱ्या अर्थाने मुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेत शिरल्याचे चित्र दिसू लागले आहे.
गेले काही दिवस खडसे यांचा वारू चौफेर उधळला होता. शेतकरी मोबाईलचे बिल भरतात आणि वीजेचे बिल थकवितात, अशा आशयाच्या खडसे यांच्या वक्तव्यावरुनही बराच गदारोळ झाला आहे. खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला नाराज न करण्याची भूमिका पक्षाने घेतली होती. पण नाथाभाऊ खडसेंचे जरा अतिच होऊ लागल्याने दिल्लीच्या परवानगीनंतरच बहुधा मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकाराची जाणिव त्यांना करून दिली.   कृषीपंपांसाठीचा जळालेला ट्रान्सफॉमर्स बदलायचा असेल, तर शेतकऱ्यांनी थकलेल्या बिलाच्या किमान ७० टक्के रक्कम भरण्याची अट आहे. ती रद्द करुन जो प्रथम मागेल, त्या तत्वावर ट्रान्सफॉर्मर्स मिळाले पाहिजेत, अशी मागणी खडसे यांनी बैठकीत लावून धरली. त्याला उद्योग मंत्री प्रकाश मेहता यांनी विरोध केला आणि ही अट पाळली गेली पाहिजे, असे मत मांडले. त्यावर बराच खल झाला. शेवटी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करीत खडसे यांना थोपविले आणि धोरणाचा विचार योग्य वेळी केला जाईल. तोपर्यंत वीज वितरण कंपनीने २००० ट्रान्सफॉर्मर्स तयार ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मुनगंटीवार खूश झाले
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना जरा दमांन घेण्याचा सल्ला देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूरच्या विकासाचे निर्णय घेत त्यांना खुश केले आहे. मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात बांबू संशोधन व प्रशीक्षण केंद्र, वन प्रशीक्षण संस्थेचे वन अकादमीमध्ये रुपांतर, बुरुड समाजातील बांबू कारागिरांना सवलत, सामाजिक वनीकरण संचालनालय वन विभागात समाविष्ट करण्याचे निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले.