मुंबई : आषाढी वारी पूर्वापार चालत आलेली वैभवशाली परंपरा आहे. यंदा मोसमी पावसाचे आगमन लवकर झाल्याने सर्व मानाच्या पालख्यांसह अन्य पालख्यांमधील वारकऱ्यांची संख्या दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या संभाव्य वाढत्या संख्येला पुरतील आणि पावसापासून बचाव होईल, असे वॉटर प्रुफ मंडप, तंबू, सोयी – सुविधा पुरवाव्यात. फिरती शौचालये, पाणी, आरोग्य आणि पोलिस बंदोबस्तासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृहात बुधवारी आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विविध विभागाचे वरीष्ठ अधिकारी मानाच्या दहा दिंड्यांचे प्रमुख उपस्थित होते. पुणे, पिंपरी चिंचवड आयुक्तांनी पालख्यांच्या स्वागतासाठी वेगळी व्यवस्था करावी.
रस्त्याच्या बाजूला मंडप टाकून स्वागत करावे, मात्र, पालख्यांना विलंब होवू नये, याची दक्षता घ्या. राज्यातील विविध भागांतून पालख्या पंढरपूरला येतात. नाशिक, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणाहून येणाऱ्या पालख्यांना पालखी मार्गात सोयी सुविधा देण्यासाठी नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी समन्वयांनी बैठक घेवून उपाययोजना कराव्यात. आपापल्या जिल्ह्यातून पालख्या जाताना स्थानिक प्रशासनाने रस्ते, पाणी, वीज, पोलिस बंदोबस्त, आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी तत्काळ बैठका घेऊन नियोजन करा. पोलिस महासंचालक यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय साधून पालख्यांच्या बंदोबस्ताची, वाहनांच्या वाहतुकीचे नियोजन करून अपघात होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कोणतीही पालखी, दिंडी पोलिसांविना राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
वाखरी मॉडेल वारकरी तळ करणार
सर्व संतांच्या मानाच्या पालख्या वाखरीजवळ एकत्र येतात. या ठिकाणी पालख्यांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. सोलापूर जिल्हा प्रशासनाने गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी योग्य नियोजन करून दक्षता घ्यावी. नामदेव महाराज यांच्या ओट्याचा पुनर्विकास करावा. गर्दी लक्षात घेऊन वाखरीचे विशिष्ट मॉडेल वारकरी तळ होण्यासाठी आराखडा तयार करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. आमदार अभिजित पाटील यांनी वाखरी तळाच्या बाजूला असलेली रेल्वेची २८ एकर जागा कायमस्वरुपी ताब्यात घेण्याची मागणी केली, त्याला फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यंदाच्या वारीसाठी….
वारकऱ्यांसाठी यंदाही ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ सुरू राहील.
मानाच्या पालखीमधील वारकऱ्यांना दर्शन पास योग्य प्रमाणात वाढवून दिले जातील.
निर्मल वारी, हरित वारी हा उपक्रम राबविण्यात येईल.
पावसाचा जोर राहणार असल्याने वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी पालखी मुक्काच्या ठिकाणी ३६ वॉटर प्रुफ मंडप टाकले जातील.
महिलांसाठी हिरकणी कक्षासह स्नानगृहांची सोय.
वारकऱ्यांसाठी अधिक बस, रेल्वे उपलब्ध करून देणार.
पुण्यात स्वागत कमानी, ध्वनीक्षेपकांवर बंदीची दिंडी प्रमुखांची मागणी.