मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी सकाळी नवी दिल्लीला जाऊन भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. ओल्या दुष्काळामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस शहांकडे करणार आहेत, असे उच्चपदस्थांनी सांगितले. मात्र हे निमित्त असले तरी शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्याच्या दृष्टिकोनातून ही भेट आहे. मुख्यमंत्री दिल्लीत डेरेदाखल होत असताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे सोमवारी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची तरतूद त्यांच्या मदतीसाठी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विरोधकांनी प्रति हेक्टरी २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची मागणी केली आहे.

या पाश्र्वभूमीवर मोठय़ा निधीची गरज राज्य सरकारला भासणार असून केंद्राने मदत द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस शहा यांना करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीमागे केंद्राच्या आर्थिक मदतीचे कारण असले तरी सत्तास्थापनेचा राजकीय तिढा सोडविण्यासाठीही शहा यांच्याशी चर्चा होणार आहे. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शिवसेनेचा आग्रह असल्याने महत्वाची कोणती व किती खाती द्यायची व ही कोंडी कशी फोडायची, याविषयीही उभयतांमध्ये चर्चा होईल.

दरम्यान, खासदार राऊत हे सोमवारी राजभवनावर जाऊन राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे राऊत यांनी सांगितले.  सरकार स्थापनेसाठी सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षास सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करावे, अशी विनंती राऊत राज्यपालांना करणार आहेत. यामुळे तर्कवितर्काना उधाण आले आहे.