‘मुंबई सागरी किनारा मार्ग’ या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत असलेल्या दोन बोगद्यांपैकी दुस-या बोगद्याचे १ हजार मीटरचे खोदकाम पूर्ण झाले आहे. केवळ ११९ दिवसात १ हजार मीटरचा टप्पा गाठला आहे. पहिल्या बोगद्याचे खोदकाम याचवर्षी जानेवारी महिन्यात पूर्ण झाले होते. बोगद्यात काम करणा-या अभियंता व कामगार वर्गाने मावळा या यंत्राच्या आकाराचा केक कापून हा आनंद साजरा केला.

सागरी किनारा मार्ग प्रकल्पांतर्गत २ महाबोगदे खणण्यात येत आहे. ‘मावळा’ या अवाढव्य संयंत्राचा वापर करून हे दोन बोगदे खणले जात आहेत. या पैकी दुसऱ्या बोगद्याच्या कामाने वेग घेतला आहे. बोगद्यातील महत्त्वाचा भाग असणारे कंकणाकृती कडे हे बोगद्याचे खोदकाम झाल्यानंतर त्यापाठोपाठ लगेचच उभारण्याचे काम देखील वेगात सुरु असून दुस-या बोगद्यात आतापर्यंत ४९५ कंकणाकृती कडी उभारण्यात आली आहेत.

सागरी किनारा मार्गासाठी बोगदे खणण्याच्या कामाला ११ जानेवारी २०२१ रोजी सुरुवात झाली होती. तेव्हापासून बोगदे खणण्याचे काम अव्याहतपणे सुरु आहे. यानंतर पहिल्या बोगद्याचे खोदकाम १० जानेवारी २०२२ रोजी पूर्ण झाले होते. १ एप्रिल २०२२ पासून दुस-या बोगद्याचे खोदकाम सुरु करण्यात आले.

दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी २.०७ किलोमीटर एवढी असेल. तसेच खणण्यात येत असलेल्या दोन्ही बोगद्यांचा व्यास हा प्रत्येकी १२.१९ मीटर आहे. या बोगद्यांना वर्तुळाकृती पद्धतीने काँक्रिटचे अस्तर (Concrete Lining) असेल. त्यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याचा अंतर्गत व्यास हा प्रत्येकी ११ मीटर इतका असेल.

सागरी किनारा मार्गाचा महत्त्वाचा भाग असणारे महाबोगदे खणण्याची सुरुवात प्रियदर्शनी पार्क येथून करण्यात आली आहे. हे बोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या स्वराज्य भूमीलगतच्या ‘छोटा चौपाटी’पर्यंत असणार असून ते ‘मलबार हिल’ च्या खालून जाणार आहेत. दोन्ही बोगद्यांसाठीचे खोदकाम हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढ्या खोलीवर करण्यात येत आहे.

हे बोगदे खणण्यासाठी १२.१९ मीटर व्यास असणारे भव्य असे ‘टनेल बोरिंग मशीन’ वापरण्यात येत असून या संयंत्राचे ‘मावळा’ असे नामकरण करण्यात आले आहे. हे संयंत्र ४ मजली इमारती एवढे उंच असून त्याची लांबी ही तब्बल ८० मीटर एवढी आहे.

मावळा’ या संयंत्राची पाती ही प्रत्येक मिनिटाला साधारणपणे २.६ वेळा गोलाकार फिरु शकणारी आहेत (2.6 RPM). ‘मावळा’ या संयंत्राचे प्रत्यक्ष प्रचलन हे संगणकीय पद्धतीने होत आहे. तर ‘मावळा’ या संयंत्राची उर्जा क्षमता ही ७,२८० किलोवॅट एवढी असून प्रकल्प कालावधी दरम्यान दररोज़ सरासरी ८ मीटर बोगदा खणला ज़ात आहे.