मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ म्हणजेच मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी अशा पहिल्या टप्प्याची चाचणी (ट्रायल रन) फेब्रुवारीच्या मध्यावर केली जाणार असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोशन (एमएमआरसी) कडून जाहीर करण्यात आले होते. मात्र अद्याप ही चाचणी रखडली आहे. चाचणी जितक्या लवकर सुरु होईल तितक्या लवकर मेट्रो ३ चा पहिला टप्पा सेवेत दाखल होणार आहे.

एमएमआरसीकडून ३३.५ किमीची कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो मार्गिका बांधली जात आहे. आतापर्यंत ही मार्गिका सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांनी या मार्गिकेच्या कामास विलंब झाला आहे. दरम्यान एमएमआरसीएलने ही मार्गिका आरे ते बीकेसी आणि बीकेसी ते कुलाबा अशा दोन टप्प्यात वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार कामाला वेग दिला. हे दोन्ही टप्पे वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी यापूर्वी एमएमआरसीने अनेक तारखा जाहीर केल्या. मात्र त्या मुदतीत प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. आता पहिल्या टप्प्यासाठी एप्रिल-मेची तारीख दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही तारीख देतानाच आता मेट्रो २ मार्गिका दोन नव्हे तर तीन टप्प्यात वाहतूक सेवेत दाखल होणार असल्याची घोषणा नुकतीच एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पावरील एका परिषदेत केली आहे. त्यानुसार आरे ते बीकेसी, बीकेसी ते वरळी आणि वरळी ते कुलाबा असे हे तीन टप्पे असतील.

हेही वाचा…एमएसआरडीसी मुख्यालय लवकरच जमीनदोस्त; २९ एकर भूखंडावर उत्तुंग इमारती, अदानी समूहाला कंत्राट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेट्रो ३ मार्गिका तीन टप्प्यात वाहतूक सेवेत दाखल होईल असे जाहीर करतानाच भिडे यांनी येत्या पंधरा दिवसात अर्थात फेब्रुवारीच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात पहिल्या टप्प्याची चाचणी सुरु होईल असेही जाहीर केले होते. १९ फेब्रुवारीला मुंबई सागरी किनारा रस्त्याच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणावेळी आरे ते बीकेसीच्या चाचणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवतील अशी चर्चा होती. मात्र सागरी किनारा प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले आहे. तर दुसरीकडे मेट्रो ३ ची चाचणीही रखडली आहे. पहिला टप्पा एप्रिल-मे मध्ये सेवेत दाखल करायचा असल्यास शक्य तितक्या लवकर चाचणी घेऊन सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरु करणे आवश्यक आहे. याविषयी एमएमआरसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी कोणती ही प्रतिक्रिया दिली नाही.