मंगल हनवते
मुंबई : ‘मेट्रो २ अ’ (दहिसर ते डी.एन.नगर) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर पूर्व – अंधेरी पूर्व) मार्गिकेतील दहिसर – आरे या पहिल्या टप्प्याला मुंबईकरांकडून थंड प्रतिसाद मिळत आहे. हा टप्पा सेवेत दाखल होऊन एक महिना पूर्ण होत असून या महिनाभरात केवळ आठ लाख ८३ हजार ३५४ मुंबईकरांनी मेट्रो प्रवास केला आहे. या मेट्रोतून प्रतिदिन तीन ते साडेतीन लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) होता. मात्र, प्रत्यक्षात दिवसाला सरासरी २५ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. एमएमआरडीएला महिनाभरात तिकीट विक्रीतून एक कोटी ७५ हजार रुपये महसूल मिळाला आहे.
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकेतील दहिसर-आरे असा एकूण २० कि.मी.चा लांबीचा टप्पा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २ एप्रिलला वाहतूक सेवेत दाखल झाला. या टप्प्यावरील व्यावसायिक वाहतुकीस ३ एप्रिलपासून सुरुवात झाली. या टप्प्याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा एमएमआरडीएला होती. दिवसाला लाखो प्रवासी या मार्गिकेवरून प्रवास करतील असा विश्वास एमएमआरडीएला होता. पण प्रत्यक्षात मात्र प्रवाशांकडून थंड प्रतिसाद मिळत आहे. एमएमआरडीएकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार २ एप्रिल ते १ मेदरम्यान दहिसर-आरे मार्गिकेवरून आठ लाख ८३ हजार ३५४ प्रवाशांनी प्रवास केला. २ एप्रिलला १९,१६७ प्रवाशांनी प्रवास केला असून या दिवशी मोफत प्रवासाची मुभा देण्यात आली होती. या दिवशी केवळ रात्री आठ ते दहा अशी सेवा सुरू होती. ३ एप्रिलला मात्र प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली. या दिवशी ५६,७०४ जणांनी प्रवास केला. पण त्यानंतर मात्र प्रवाशांची संख्या रोडवत गेली.
या मार्गिकेवर ३ एप्रिल रोजीचा सर्वाधिक म्हणजे ५६,७०४ प्रवाशांनी प्रवास केला. त्यानंतर १० एप्रिलला प्रवासी संख्या ४८,२८३ इतकी होती. या दोन दिवसांचा अपवाद वगळता प्रतिदिन प्रवासी संख्या २५ ते ३६ हजारांच्या दरम्यान होती. २७ एप्रिलला सर्वात कमी २५,३६२ इतक्या प्रवासी संख्येची नोंद झाली. महिनाभरात आठ लाख ८३ हजार ३५४ जणांनी मेट्रोतून प्रवास केला असून एमएमआरडीएला तिकीट विक्रीतून एक कोटी ७५ हजार रुपये महसूल मिळाला.
याबाबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी प्रतिसाद कमी असल्याचे मान्य केले आहे. मात्र, ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ या दोन्ही मार्गिका पूर्णत: सेवेत दाखल झाल्यानंतर नक्कीच प्रवासी संख्येत वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2022 रोजी प्रकाशित
दहिसर-आरे मेट्रोला थंड प्रतिसाद; महिन्याभरात केवळ पावणेनऊ लाख मुंबईकरांचा प्रवास, तिकीट विक्रीतून एक कोटी ७५ हजार रुपये महसूल
‘मेट्रो २ अ’ (दहिसर ते डी.एन.नगर) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर पूर्व - अंधेरी पूर्व) मार्गिकेतील दहिसर - आरे या पहिल्या टप्प्याला मुंबईकरांकडून थंड प्रतिसाद मिळत आहे.
Written by मंगल हनवते

First published on: 03-05-2022 at 00:52 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cold response dahisaraarey metro journey mumbaikars revenue thousand ticket sales amy