लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सुशोभिकरणाच्या मागे लागली आहे. त्यामुळे प्रशासनाचे महानगरपालिकेच्या दैनंदिन कामांकडे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळापूर्व आढावा बैठकांचे आयोजनही अद्याप करण्यात आलेले नाही. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात मुंबई जलमय झाल्यास त्यास आयुक्त जबाबदार असतील, असा इशारा समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी प्रशासनाला दिला आहे.
सध्या सुरू असलेली पावसाळापूर्व कामे जलदगतीने पूर्ण करावी, अशी मागणी करणारे निवेदन रईस शेख यांनी महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना दिले. मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची मुदत संपलेली असून महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविणे आणि कामांची अंमलबजावणी करणे ही प्रशासकांची जबाबदारी आहे. पावसाळापूर्व कामे वेळेत होणे आवश्यक आहे. नालेसफाई, कचऱ्याची विल्हेवाट, सांडपाणी व्यवस्थापन या महत्त्वाच्या नागरी सुविधा वेळेत उपलब्ध होणे आवश्यक आहे. मुंबईतील सखल भागातील कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणेही गरजेचे आहे. अन्यथा नाले कचऱ्याने तुडुंब भरतात. परिणामी सखलभाग जलमय होऊन मुंबईतील वाहतूक व्यवस्था ठप्प होते. दरवर्षी परंपरेनुसार आयुक्त पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेतील सर्व विभागांतील अधिकाऱ्यांची बैठक घेतात. परंतु यावर्षी अद्याप ही बैठक झालेली नाही. त्यामुळे पावसाळापूर्व कामे न झाल्यास मुंबई शहराला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे शेख यांनी निवेदनात म्हटले आहे.
आणखी वाचा- मुंबई : वृत्तपत्र छायाचित्रकार महेंद्र पारीख यांचे निधन
मान्सूच्या आगमनाला फक्त १ महिना उरला असून त्यामुळे आढावा बैठकीचे आयोजन करणे आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिका सध्या सौंदर्यीकरणाच्या मागे आहे. महानगरपालिकेने आता सौंदर्याकरणाऐवजी नागरी मुलभूत सुविधांकडे लक्ष द्यायला हवे, असे मत शेख यांनी व्यक्त केले आहे. मुंबई तुंबली तर प्रशासक / आयुक्त म्हणून सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, असाही इशारा शेख यांनी पत्रात दिला आहे.
मुंबई शहरातील खड्ड्यांची संख्या जास्त असल्यामुळे वाहतूक कोंडी, तसेच वाहनांचे नुकसान होते. तसेच मोठ्या प्रमाणावर अपघात होतात. याला पायबंद घालण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असून रस्त्यावरील खड्डे बुझवणे व प्रगतीपथावरील कामे सुरक्षित व सुस्थितीत आणण्याकरिता कामांचा वेग वाढवणे, तसेच नियोजनानुसार सर्व कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी मान्सूनपूर्व सर्व खड्डे बुजवण्याची कामे तात्काळ पूर्ण करावी, अशीही मागणी शेख यांनी केली आहे.