मुंबई : गेल्या आठवडयाभरापासून वाढलेला उकाडय़ामुळे हैराण झालेल्या प्रवाशांचा  वातानुकूलित लोकल प्रवासाकडे कल वाढला आहे. मध्य आणि पश्चिम मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलमधून ११ व १५ मार्च रोजी प्रत्येकी एक हजाराहून अधिक तिकिटांची विक्री झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. विशेषत: मध्य रेल्वेवर सकाळी-संध्याकाळी धावणाऱ्या जलद लोकलला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या मुख्य मार्गावर १९ फेब्रुवारीपासून नवीन वातानुकूलित लोकल फेऱ्या सोडण्यात आल्या. अशा ३४ वातानुकूलित फेऱ्यांची भर पडली. यापूर्वी सीएसएमटी ते कल्याण मार्गावरच दहा वातानुकूलित लोकल फेऱ्यांची सेवा होती. तर सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव या हार्बर मार्गावर १६ फेऱ्या चालवण्यात येत होत्या. नवीन फेऱ्यांमुळे एकूण वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ६० झाली. १९ फेब्रुवारीला १४५ तिकिटांची आणि १३ पासची विक्री झाली होती. फेऱ्या आणि तिकीट, पास विक्री पाहता प्रवाशांचा प्रतिसाद फारच कमी मिळत असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र गेल्या आठवडय़ापासून मुंबई व उपनगरात हळूहळू वाढत असलेल्या प्रचंड उकाडय़ामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सामान्य लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना घामाच्या धारा लागत आहेत. उकाडा सहन होत नसल्याने काही प्रवाशांनी सामान्य लोकलऐवजी वातानुकूलित लोकल प्रवासाला पसंती दिली आहे. यातही पास काढण्यापेक्षा तिकीट काढण्यावरच प्रवाशांनी अधिक भर दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commuters good response to ac local trains due to temperature increased zws
First published on: 17-03-2022 at 01:45 IST