लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : आंतरराष्ट्रीय टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल कंपनी थॉमस कूक इंडिया लिमिटेडने सुमारे एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी सहाय्यक व्यवस्थापकाविरोधात अंधेरी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली आहे. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल केला.

कंपनीच्या वतीने सुहेल शेख यांनी पोलिसांकडे तक्रार केली. आरोपी माजी कर्मचारी नागेश संतोष राव २०१६ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत कंपनीत कामाला होते. ते कंपनीस सहयोगी उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. इम्प्लांट (कंपनीच्या मोठ्या व्यावसायिक ग्राहकांसाठी नियुक्त केलेला अधिकारी) म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती. संबंधित अधिकारी ग्राहक कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्व विमान व इतर नोंदणीबाबतचे व्यवहार हाताळतात.

आणखी वाचा-Mumbai Heavy Rain : मुंबईत शुक्रवारपर्यंत अतिवृष्टी, हवामान विभागाचा इशारा

पोलीस तक्रारीनुसार, थॉमस कूक इंडिया लिमिटेडने जून २०२३ मध्ये ग्राहकाला व्हाउचर पाठवले. ग्राहक कंपनीने त्यांना २५० विमान तिकीटे व ३५ पावत्यांवरील व्यवहर असे एकूण ९४ लाख सात हजारांची नोंदणी त्यांनी केली नाही. असे सांगून त्यांनी रक्कम देण्यास नकार दिला. त्यानंतर, थॉमस कूक इंडियाच्या ऑडिट, क्रेडिट कंट्रोल आणि कलेक्शन पथकाने कागदोपत्री तपासणी केली. त्यावेळी संबंधित नोंदणी नागेश राव याने ग्राहक कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या युनिक आयडीचा वापर करून तयार केलेल्या बोगस प्रोफाइलद्वारे केल्याचे निष्पन्न झाले. त्यासाठी बनावट पावत्याही सादर करण्यात आल्या. नोंदणी करताना राव यांचा स्वतःचा क्रमांकही टाकण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राव यांनी केलेल्या अनियमिततेबाबतची माहिती लेखापरीक्षण अहवालामुळे कंपनीच्या लक्षात आली. त्यावेळी कंपनीने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यावेळी त्यांनी वरिष्ठांसमोर आपली चूक कबूल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राव यांनी मेहुण्यासोबत स्वतःची कंपनी स्थापन केली होती. त्याद्वारे हा गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी राव यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६ (गुन्हेगारी विश्वासभंग), ४०८ (कर्मचाऱ्याने विश्वासभंग करणे), ४२० (फसवणूक) आणि ४६५ (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तक्रारदार कंपनीला लेखापरीक्षण अहवालाची एक प्रत सादर करण्यास सांगितले आहे. त्याद्वारे पुढील तपास करण्यात येणार आहे.