मुंबई : अंधेरी पूर्वेकडील सहार एअरपोर्ट रोड येथील हॉटेल हिल्टन मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट या नामांकित हॉटेलने प्रवेशद्वार आणि प्रवेशमार्ग तयार करण्यासाठी पदपथ तोडल्याची तक्रार वॉचडॉग फाऊंडेशनने मुंबई महानगरपालिकेकडे केली आहे. हा पदपथ नुकताच नव्याने तयार करण्यात आला होता. नुकत्याच दुरुस्त केलेल्या सार्वजनिक पदपथाचे नुकसान करून बेकायदेशीरपणे प्रवेशद्वार तयार करण्यात आल्याबाबत वॉचडॉग फाऊंडेशनने तकार केली आहे.

अंधेरी पूर्वेकडील विमानतळ परिसरात अनेक पंचतारांकित हॉटेल असून यापैकी हॉटेल हिल्टनच्या व्यवस्थापनाने पदपथ तोडून वाहनांसाठी प्रवेशमार्ग, उतार तयार केला असल्याचा आरोप वॉचडॉग फाऊंडेशन या संघटनेने केला आहे. वॉचडॉग फाऊंडेशनचे पिमेंटा गॉडफ्रे यांनी याप्रकरणी पालिका प्रशासनाला लेखी तक्रार केली आहे. रविवारी २२ जून २०२५ सार्वजनिक सुट्टीचा फायदा घेत हॉटेलने कोणतीही परवानगी न घेता हे बांधकाम केल्याचा आरोप गॉडफ्रे यांनी केला आहे. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित हॉटेलकडून त्वरित मूळ पदपथाची पूर्ववत दुरुस्ती करण्याची तसेच झालेले नुकसान वसूल करण्याची मागणी वॉचडॉग फाऊंडेशनने केली आहे. दरम्यान, या प्रकरणी सहाय्यक आयुक्त नितीन शुक्ला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.