मुंबई: राज्यातील जनतेसाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्वरित सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी वैद्यकीय शिक्षण विभागास दिले. शिर्डीमध्ये साई संस्थानच्या वतीने अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील जनतेला सर्वसमावेशक कर्करोग उपचार सेवा उपलब्ध करुन देण्याबाबत बैठक पार पडली. यावेळी राज्यातील गरजू व्यक्तीला तत्काळ सेवा मिळाल्या पाहिजे, यासाठी तीन प्रकारच्या उपचार केंद्रांपैकी तिसऱ्या टप्यातील रुग्णांसाठी मदत केंद्र स्थापन करावे. त्याचबरोबर कर्करोगाशी लढणाऱ्या रुग्णांना शीघ्र निदान व प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध करून द्यावी.
प्रत्येक जिल्ह्यात समग्र कर्करोग उपचार सेवा, निदान, डे केअर रेडिओथेरेपी आणि केमोथेरपी युनिटची उभारणी करण्याचे आदेशही फडणवीस यांनी दिले. बैठकीस आरोग्य राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आरोग्य विभागाचे सचिव विनायक निपुण, सचिव वीरेंद्र सिंग, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, आरोग्य सेवा आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे तसेच कॅन्सर केसर प्रकल्पाचे मानद सल्लागार कैलास शर्मा, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सी.एस. प्रमेश, संचालक डॉ.श्रीपाद बनावली, संचालक डॉ.पंकज चतुर्वेदी आदी उपस्थित होते. कर्करोगावर प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी विविध पातळ्यांवर कर्करोग उपचार केंद्रांची उभारणी आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नागपूर येथील संत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालयाच्या इमारतीचे अपूर्ण बांधकाम तत्काळ पूर्ण करण्यात यावे. यासाठी आवश्यक असलेला निधी पुरवणी मागणीच्या माध्यमातून देण्यात येईल. तसेच साई संस्थान यांच्या वतीनेही साईनगर शिर्डी येथे अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय उभारणीबाबत संस्थानला आदेश दिले जातील असेही फडणवीस यांनी सांगितले.