कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ रविवारी मुंबईत काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष, भारिप-बहुजन महासंघ, कम्युनिस्ट पक्ष, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, रिपब्लिकन सेना व अन्य पुरोगामी संघटनांच्या वतीने ठिकठिकाणी निदर्शने, रास्ता रोको करण्यात आले. वरळीत निषेध मोर्चाही काढण्यात आला. डाव्या पक्षांनी पुकारलेल्या बंदला मात्र मुंबईत कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. श्रमिक प्रतिष्ठानतर्फे कॉ. र.ग. कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली प्रभादेवी येथील भूपेश गुप्ता भवनात निषेध सभा आयोजित केली होती. पानसरे यांच्या मारेक ऱ्यांना त्वरीत अटक करा, अशी मागणी सभेत करण्यात आली.