मुंबईत शिवसेना भवनसमोर शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यानंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जाऊ लागले आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना भवनासमोर आंदोलन केलं जात असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून वादाचं रुपांतर राड्यामध्ये झालं. यावरून काँग्रेस आमदार आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. “भाजपाची अवस्था जलबिन मछलीसारखी झाली आहे. माश्याला पाण्याबाहेर काढल्यासारखी परिस्थिती भाजपाची आहे. सत्ता गेल्यापासून त्यांना कशाची शुद्धच राहिलेली नाही”, असं अस्लम शेख म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

..तर शिवसैनिक शांत बसतील का?

दरम्यान, यावेळी अस्लम शेख यांनी भाजपावर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. “काय करायचं, काय नाही करायचं, हे भाजपाला कळेनासं झालंय. ते सेना भवन तोडायला जात असतील, तर शिवसैनिक शांत बसतील का? कायदा हातात घ्यायचा आणि अशांतता राज्यात यायला पाहिजे वातावरण चांगला राहिलं नाही पाहिजे यासाठी काम करायचं. करोना काळात देखील त्यांनी हेच केलं. सर्व उघडण्याची मागणी केली. त्यांची सत्ता असलेल्या राज्यात काहीच नव्हतं. पण महाराष्ट्रात त्यांची नाटकं सुरू होती. शिवसेना आणि काँग्रेसला बदनाम करण्यासाठी ते हवं ते करतील”, असं अस्लम शेख म्हणाले आहेत.

नेमकं झालं काय?

अयोध्येमध्ये राम जन्मभूमीलगतच्या जमिनीच्या खरेदी व्यवहारावरून हा वाद सुरू झाला आहे. या व्यवहारामध्ये घोटाळा झाल्याचं काही कागदपत्रांवरून समोर आलं असून त्यावरून आता भाजपावर टीका केली जात आहे. शिवसेनेकडून देखील या मुद्द्यावरून भाजपाला लक्ष्य केलं गेलं. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही अयोध्येला गेलो त्यावेळी ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे एक कोटी रुपयांची रक्कम दिली होती. राम मंदिराच्या नावे देशभरातून-परदेशातून शेकडो कोटी रुपये गोळा झाले आहेत. प्रभू श्रीराम यांच्या नावे एका पैशाचाही घोटाळा होऊ नये. पण जमिनीच्या खरेदीतील घोटाळ्याचे प्रकरण समोर आल्याने श्रद्धेला ठेच लागली आहे. राम मंदिर विश्वस्त संस्थेच्या प्रमुखांनी याबाबत भूमिका स्पष्ट के ली पाहिजे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनीही भूमिका स्पष्ट करणे गरजेचं आहे”, अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे.

शिवसेना भवनसमोर भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

दरम्यान, शिवसेनेच्या टीकेनंतर भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी थेट शिवसेना भवनासमोर आंदोलन सुरू केलं. यासंदर्भात बोलताना शिवसेनेचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी “भाजपाचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते शिवेसना भवनमध्ये जमले होते. भाजपाचे काही कार्यकर्ते दगडफेक करणार असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. यामुळे शिवसैनिकांनी त्यांना थाबवलं असता बाचाबाची झाली”, असं एबीपीशी बोलताना सांगितलं.

भाजपाला संस्कृतीबद्दल काही माहिती आहे का?

दरम्यान, यावेळी अस्लम शेख यांनी भाजपाकडून करण्यात आलेल्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं आहे. ‘शिवसेनेची सोनियासेना झाली आहे’ अशी टीका भाजपाकडून करण्यात आल्याबद्दल पत्रकारांनी अस्लम शेख यांना विचारलं असतान त्यांनी त्याला उत्तर दिलं. “भाजपाला संस्कृतीच्या बद्दल काही माहिती आहे का? त्यांच्या नेत्यांनी कधी महिलांचा सन्मान केला आहे का? त्यांची मानसिकता तशीच राहणार आहे. सोनिया गांधींशिवाय त्यांना जेवणच जात नाही. राहुल गांधींचं नाव घेतल्याशिवाय त्यांचं स्टेटमेंटच पूर्ण होत नाही. काँग्रेसशिवाय देशाचं राजकारण चालणार नाही हे त्यांना माहिती आहे”, असं ते म्हणाले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress aslam shaikh slams bjp on chaos outside shivsena bhawan mumbai pmw
First published on: 16-06-2021 at 17:49 IST