कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष नसली तरी अप्रत्यक्षपणे मदत करावी म्हणून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी काँग्रेसशी संपर्क साधला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेसचे चार तर राष्ट्रवादीचे दोन अशा सहा जणांना गळाला लावण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसेनेने सुरू केला आहे. काँग्रेसचे नगरसेवक पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यास ही मते निर्णायक ठरणार आहेत. यामुळेच भाजपच्या एका उच्चपदस्थाने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याशी संपर्क साधल्याचे समजते.
थेट मदत करणे शक्य नसल्याने तटस्थ वा अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे मदत करावी, अशी विनंती काँग्रेसला करण्यात आली आहे. चारही नगरसेवक पक्षाबरोबर राहिल्यास कोणाला मदत करायची याचा निर्णय पक्षाला घ्यावा लागणार आहे. काँग्रेस आणि भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील संबंध लक्षात घेता व मुख्यमंत्र्यांवर कुरघोडी करण्याच्या उद्देशाने भाजपपेक्षा काँग्रेसला शिवसेना अधिक सोयीची आहे. अर्थात, मुख्यमंत्रिपद भाजपकडे असल्याचे लक्षात घेऊन काँग्रेसचे नेते निर्णय घेऊ शकतात, असेही बोलले जाते.
राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक असले तरी कोणालाही पाठिंबा देण्यात राष्ट्रवादीला अडचणीचे ठरणार नाही. मात्र भाजपला मदत केल्यास काँग्रेसला ते अडचणीचे ठरू शकते. यामुळेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करूनच काँग्रेसची भूमिका निश्चित केली जाईल, असे सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Nov 2015 रोजी प्रकाशित
सेना-भाजपकडून काँग्रेसची मनधरणी
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे चार नगरसेवक निवडून आले आहेत.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद

First published on: 06-11-2015 at 06:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress corporators in contact with bjp shivsena