कंपनी कायद्यानुसार एकच संचालक ओळख क्रमांक (डायरेक्टर आयडेन्टिफिकेशन नंबर) असणे आवश्यक असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सहा तर विनोद तावडे यांनी तीन क्रमांक मिळवून सरकारची फसवणूक केली असल्याने भाजपच्या या दोन्ही मंत्र्यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच तावडे यांच्या हकालपट्टीसाठी काँग्रेसने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तावडे यांच्यावर तोफ डागली.

तावडे यांचा दावा चुकीचा

‘श्री मल्टिमिडिया व्हिजन लिमिटेड’ या कंपनीत मानद संचालक असल्यानेच निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख केला नाही, असा खुलासा विनोद तावडे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपांवर केला होता. फायदा उकळणाऱ्या कंपनीत मानद संचालक हे पदच अस्तित्वात नाही. शिवाय तावडे संचालक असलेल्या कंपनीची केंद्र सरकारकडे फायदा उकळणाऱ्या श्रेणीत नोंद झाली

आहे. यामुळेच तावडे यांचा दावा चुकीचा असल्याचे निरुपम यांनी सांगितले. विधिमंडळाच्या  अधिवेशनात तावडे यांच्या विरोधातील प्रकरण लावून धरणार असल्याचेही विखे-पाटील यांनी जाहीर केले. तावडे राजीनामा देण्याची शक्यता नसल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली.

तावडेंनी आरोप फेटाळले!

तावडे यांनी हे आरोप फेटाळलेच, पण राजीनाम्याची मागणीही धुडकावून लावली. नियमानुसार माझ्याकडे फक्त एकच डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर  आहे, अन्य दोनपैकी एक अमान्य झाला होता, तर दुसरा व्यपगत झाल्याने  अस्तित्वातच नाही, त्यामुळे हा  दावा हास्यास्पद आहे, असे तावडे म्हणाले.