मुंबई: मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करायची असेल तर केवळ  दोन वर्षांचीच कशाला करता तर मागील २५ वर्षांतील कामांची करा,  अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच पालिकेत सत्तेत राहिलेल्या भाजपला स्वत:ची सुटका करून घेता येणार नाही, असेही त्यांनी सुनावले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने मुंबई पालिकेतील मागील दोन वर्षांच्या कालावधीत झालेल्या कामांची चौकशी नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत नाना पटोले म्हणाले की,  सरकारने चौकशी करण्याचे दिलेले आदेश हे राजकीय द्वेषातून दिलेले

आहेत. भाजपला खरेच भ्रष्टाचार निपटून काढायचा असेल तर फक्त २ वर्षांची चौकशी कशाला करता मागील २५ वर्षांतील कामांची चौकशी करावी. म्हणजे भाजप पालिकेत सत्तेत भागीदार असतानाचेही गैरव्यवहार उघड होतील, असा टोला पटोले यांनी लगावला.

‘सरकार बरखास्त करा ’

 सरकार मागील तीन महिन्यांत कोणत्याही घटकाला दिलासा देऊ शकले नाही. जनतेला दिलासा देण्यासाठी हे सरकार बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून केली.