मुंबई : राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल ३० जिल्ह्यांत नुकसान झाले. राज्यातील १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर इतके क्षेत्र या पावसाने बाधित झाले. आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, त्यात शेतातील पीकदेखील हातातून गेल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. सोयाबीन, मका, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली. शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी तसेच बँकेकडून शेतकऱ्यांची होणारी वसुली थांबवावी, पिक विमा कंपन्यांनी तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी असे वडेट्टीवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे बळीराजा आस लावून बसला होता. त्याला काही मदत मिळेल पण या बैठकीत देखील शेतकऱ्यांसाठी काही निर्णय झाला नाही. शेतकऱ्यांना नैराश्याने ग्रासूले असून त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतांचे राज्याभरातील पंचनामे लवकर पूर्ण करून ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी अशी मागणी वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आली.