मालेगावात काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. मालेगावातील काँग्रेसच्या २८ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. राष्ट्रवादी बदनाम होणार नाही, पक्षाला गालबोट लागणार नाही आणि जनतेच्या मनात चुकीची भावना निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या, अशा सूचना अजित पवार यांनी यावेळी सर्व नगरसेवकांना दिल्या. दरम्यान या पक्षप्रेशामुळे महाविकासआघाडीत पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीला जाहीर इशाराच दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“जे काही चाललं आहे ते मंथनाचं काम आहे. त्यांचे लोक आमच्याकडे आणि आमचे लोक त्यांच्याकडे हे सुरु आहे. आता त्यांनी आमचे थोडे नेले पण त्यांचे जास्त लोक आमच्याकडे येऊ लागले आहेत. हे चालणार आहे, नाराजी हा राजकारणातील भाग असतो. त्यामुळे हे फार गांभीर्यानं घेतलं नाही,” असं नाना पटोले म्हणाले.

मालेगाव : काँग्रेसला मोठं खिंडार, २८ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश; अजित पवार म्हणतात, “आता गृहखातं आपल्याकडे आहे म्हणून…”

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “राष्ट्रवादीमधून येणारे बरेच आहेत, पण गोपनीयता पाळावी लागते. जाहीर केलं तर ते अलर्ट होतील. जसं आम्हाला न विचारता काही गोष्टी ते करतात तसंच पुढच्या काळात करण्याची तयारी झाली आहे”. यावेळी त्यांनी स्वखुशीने कोणी जात असेल तर त्याला नाराजी कळवण्याची गरज काय? असा सवालही नाना पटोले यांनी केला.

“जशाला तसं उत्तर हे राजकारण आहे. त्यांनी केलेलं गैर आहे असं आम्ही म्हणत नाही, पण आम्ही केलेलं ते गैर नाही असं त्यांनाही वाटलं पाहिजे,” अशी अपेक्षा नाना पटोले यांनी व्यक्त केली.

नितीन राऊत यांच्या अनुपस्थितीवर भाष्य

काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत पक्षातील नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत अनुपस्थित होते. नितीन राऊत यांना बैठकीला बोलावलं नसून ते नाराज असल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली होती. नाना पटोले यांनी मात्र हे वृत्त फेटाळलं.

“या बैठकीत मंत्रालयासंबंधी कोणत्याही चर्चा नसल्याने ते या बैठकीत अपेक्षित नव्हते. प्रभारींना भेटण्यासाठी ते आले होते. त्यामुळे असं काहीच नाही,” असं नाना पटोले यांना सांगितलं.

तसंच त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून व्यक्त केलल्या नाराजीवर बोलताना ते म्हणाले की, “मंत्रालयात काय अडचणी येत आहेत हे त्यांनी प्रभारींना सांगितलं आहे. मंत्र्यांकडील खात्यात येणाऱ्या अडचणींसंबंधी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणं यात काही गैर नाही. एकाच पक्षाचं सरकार असेल तर त्या मंत्र्याच्या खात्यात कमी जास्त पैसे झाले तर तोदेखील तक्रार करतोच, याचा अर्थ पक्षात गडबड झाली असा अर्थ लावता येत नाही”.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress nana patole after malegaon corporators joined ncp in presence of ajit pawar sgy
First published on: 27-01-2022 at 15:55 IST