scorecardresearch

काँग्रेस-राष्ट्रवादीत धुसफूस; पटोलेंची टीका; जयंत पाटील यांची सारवासारव

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विधानावर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर टीका केली

काँग्रेस-राष्ट्रवादीत धुसफूस; पटोलेंची टीका; जयंत पाटील यांची सारवासारव
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

मुंबई : विधान परिषदेच्या पाचपैकी तीन जागा जिंकून महाविकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिला, परंतु त्याचवेळी नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विधानावर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर टीका केली, त्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर वाद अधिक पुढे जाऊ नये म्हणून सारवासारव करण्याची वेळ आली.

दादर येथील टिळकभवन येथे माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी नाशिक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केल्याचे अजित पवार यांनी विधान केले आहे, असे सांगितले. त्यावर काहीसा आक्रमक पवित्रा घेत पटोले म्हणाले की,  राष्ट्रवादी काँग्रेसने सत्यजीत तांबे यांना निवडून आणण्यासाठी मदत केली, अशा पद्धतीचे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे. अजित पवार हे एक जबाबदार नेते आहेत, ते अशा पद्धतीने बोलत असतील तर या सगळय़ा गोष्टीची चिंता आमच्याही मनात आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत त्यावर चर्चा केली जाईल.

 सायंकाळी महाविकास आघीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हा वाद अधिक वाढू नये म्हणून सारवासारव करावी लागली. ते म्हणाले की,  महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचे काम राष्ट्रवादी पक्षाने केले. मी अजित पवार यांचे विधान ऐकलेले नाही. ही जागा काँग्रेसला दिली होती. मात्र या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार अर्ज भरू शकले नाही. त्या जागेवर काँग्रेसच्या नेत्याच्या पुत्राने अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यामुळे या मतदारसंघातील काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला, असा अजित पवार यांच्या विधानाचा अर्थ असावा, अशी सारवासारव त्यांनी केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 03:42 IST