राज्यात टोल संस्कृतीचा उदय हा शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात झाल्याचा ठपका ठेवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने आता मात्र टोलचे समर्थन सुरू केले आहे. टोल अपरिहार्य असल्याची ठाम भूमिका सरकारमधील उच्चपदस्थांची असून, स्वत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे टोल बंद करण्याच्या विरोधात आहेत.
टोलच्या विरोधात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आवाज उठविताच राज्यात ठिकठिकाणी टोलनाके फोडण्यात आले.  टोलवरून राजकारण सुरू झाले असले तरी सत्ताधारी पक्षाचे नेते मात्र टोलचे समर्थन करीत आहेत. मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री नारायण राणे आणि बांधकामंत्री छगन भुजबळ या सर्वच बडय़ा नेत्यांनी टोल अपरिहार्य असल्याची भूमिका मांडली आहे. टोलबाबत सरकारने जनतेला त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सरकारला केली आहे. तर टोलच्या विरोधातील यापूर्वीच्या आंदोलनाचे काय झाले, असा सवाल राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी मनसेला केला आहे.
टोल रद्द केल्यास राज्यात रस्त्यांचे चांगले जाळे विणले जाणे शक्य नाही, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे. टोल रद्द करायचा झाल्यास देशात राज्याबद्दल चुकीचा संदेश जाईल आणि गुंतवणुकीसाठी कोणी येणार नाही, अशी सत्ताधाऱ्यांना भीती आहे. तसेच राज ठाकरे यांनी मागणी केल्याने सरकारने नांगी टाकली हा संदेश जाणेही चुकीचे ठरेल, असे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे. आगामी निवडणुकीत टोल हा प्रचाराचा मुद्दा ठरण्याची चिन्हे आहेत.