राजीनामा देण्याची घोषणा केलेले नारायण राणे यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न पक्षातून सुरू असला तरी राणे टोकाची भूमिका घेणारच असतील तर फार काही ताणायचे नाही, अशी काँग्रेसची भूमिका आहे. काही वर्षांंपूर्वी गांधी घराण्यालाच आव्हान देणाऱ्या राणे यांच्याबद्दल दिल्ली फारशी खुश नसून, केंद्रीय नेतृत्वाने त्यांना तेव्हापासून फार काही महत्त्वही दिलेले नाही.
सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देणार अशी घोषणा राणे यांनी केली तेव्हा पक्षात धक्कादायक प्रतिक्रिया उमटली नाही. राणे यांना परावृत्त करण्याकरिता गुरुवारी रात्री प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि आमदार कृपाशंकर सिंग यांनी त्यांची भेट घेतली. राणे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू, असे ठाकरे यांनी सांगितले. राणे यांच्या राजीनाम्याबद्दल दिल्लीतील पक्षाच्या नेत्यांमध्ये शुक्रवारी चर्चा झाली. राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी राज्यातील काही नेत्यांशी चर्चा केली. दिल्लीने राणे यांची मनधरणी करण्यासाठी अद्याप तरी पुढाकार घेतलेला नाही. राणे पक्ष सोडण्याची शक्यता असली तरी त्यांना थांबवण्याकरिता पक्षात फार काही उत्साह नसल्याचे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
डिसेंबर २००८ मध्ये अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर तेव्हा नेतृत्वाच्या स्पर्धेत असलेल्या राणे यांनी काँग्रेस नेतृत्वावरच तोफ डागली होती. राहुल गांधी, अहमद पटेल या नेत्यांवर त्यांचा निशाणा होता. पक्षात गांधी घराण्यातील नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पक्षात फारसे भवितव्य नसते. काँग्रेसला आव्हान देण्याचा प्रयत्न करणारे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल किंवा आंध्रचे जगनमोहन रेड्डी यांचे या संदर्भात उदाहरण दिले जाते. काँग्रेसने आंध्रची सत्ता गमाविली, पण जगनमोहन रेड्डी यांना मोठे होऊ दिले नाही. भजनलाल यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला मुख्यमंत्रीपद नाकारून पक्षाने त्यांचाही आवाज गप्प केला होता. अशोक चव्हाण ‘आदर्श’ घोटाळ्यात अडकल्यावर नवा मुख्यमंत्री नेमताना काँग्रेससमोर कोणाची नियुक्ती करायची हा प्रश्न पडला होता. तेव्हाही राणे यांच्या नावाचा विचार झाला नाही याकडे लक्ष वेधण्यात येते.
काँग्रेस नेत्यांवर आरोप केल्याने डिसेंबर २००८ मध्ये राणे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. पुढे राणे यांना पक्षात परत घेण्यात आले असले तरी त्यांना फार काही महत्त्व मिळाले नाही. पक्षाची निर्णय प्रक्रिया किंवा कोणत्याही महत्त्वाच्या पदासाठी राणे यांच्या नावाचा विचार झाला नाही.