पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या विरोधात शिवसेना-भाजप युतीपाठोपाठ आता काँग्रेसनेही बाह्य़ा सरसावल्या आहेत. मुंबईतील ठप्प झालेल्या नागरी कामांचा ठपका ठेवत सीताराम कुंटे यांना पालिका आयुक्तपदावरून हटविण्याच्या मागणीसाठी विलेपार्ले येथील आमदार कृष्णा हेगडे यांनी सोमवारी धरणे आंदोलन केले.
उपनगरवासीयांच्या मालमत्ता करात ५० टक्क्यांनी कपात करावी, दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहाच्या नूतनीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे, स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्रात बॅडमिंटन कोर्ट उभारावे, चरत सिंग कॉलनीतील मनोरंजन मैदानासाठी आरक्षित असलेल्या एक लाख चौरस फुटाच्या भूखंडावरील अतिक्रमण हटवावे, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्विकासात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी, व्ही. एन. देसाई महापालिका रुग्णालय आणि शिरोडकर रुग्णालयाचे नूतनीकरण तात्काळ सुरू करावे, विलेपार्ले येथे चांगले रस्ते बांधावेत, पाण्याचा दाब वाढवावा, अजमल रोड येथील दवाखाना सुरू करावा, के-पश्चिम कार्यालयाचे नूतनीकरण करावे, अशा विविध मागण्यांसाठी सोमवारी कृष्णा हेगडे, सुधा जोशी, नगरसेवक विन्नी डिसोझा, जगदीश अमिन यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.