उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह न करता विधीमंडळात येऊन भूमिका मांडायला हवी होती आणि त्यानंतर राजीनाना द्यायला हवा होता असं स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलं आहे. आता उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही असंही ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत.

“सुप्रीम कोर्टाचा निकाल संभ्रमात टाकणारा होता. या निकालातून काही स्पष्टता आलेली नाही. पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात काही निर्णय घेतला नाही. बरीच अनिश्चितता आहे. ११ जुलैला याचिकांवर सुनावणी करु सांगू आणि आता आपलाच निर्णय बदलला. त्यांनी विचित्र निर्णय झाला आहे. ही सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा नव्हती,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

“चाकरी करत आहात याचा पश्चाताप होईल,” उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राऊतांचं एकनाथ शिंदे गटाला आव्हान; म्हणाले “तुमचा नेता…”

“उद्धव ठाकरेंनी सभागृहात येऊन बाजू मांडायला हवी होती आणि त्यानंतर राजीनामा द्यायला हवा होता. राज्यातील जनतेला त्यांची बाजू कळाली असती. विरोधी पक्षनेते तसंच आणखी काही नेत्यांना बोलण्याची संधी मिळाली असती. आम्ही हे सरकार का स्थापन केलं हे काँग्रेस राष्ट्रवादीला सांगता आलं असतं. एक-दोन तास सभागृह चाललं असतं आणि नंतर निर्णय घेतला असता तर चाललं असतं,” असं स्पष्ट मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलं.

Video : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा अर्थ काय? गिरीश कुबेर यांनी केलेलं विश्लेषण

“आता उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही. रक्तपात होईल वैगेरे असं जे काही ते म्हणाले ते खोटं होतं. त्यांनी लढायला हवं होतं,” असंही ते म्हणाले. तसंच माझी नाराजी नसून वैयक्तिक मत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

“ज्या महाराष्ट्राच्या जनतेने अडीच वर्ष पाठिंबा दिला त्यांना सांगायला हवं होतं. फेसबुक लाईव्ह आणि विधीमंडळात बोलणं यात फरक आहे. विधीमंडळात जे बोलतो ते रेकॉर्डवर राहतं,” असं यावेळी ते म्हणाले.

VIDEO: राजीनामा देत असताना राज्यपालांसमोरच शिवसैनिकांची घोषणाबाजी; त्यानंतर उद्धव ठाकरेंनी केलं असं काही…

“एकनाथ शिंदेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर राग काढला तोही काही खरा नव्हता. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं तसंच यावेळी घडेल अशी त्यांना अपेक्षा होती. पण ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. शरद पवारांनी दोन्ही पक्षात ज्येष्ठ नेते असल्याने कनिष्ठ व्यक्तीच्या हाताखाली काम करणं अवघड जाईल अशी भूमिका घेतली होती,” अशी माहिती त्यांनी दिली.

“इतक्या मोठ्या प्रमाणात माणसं नाराज आहेत याचा त्यांना अंदाजच आला नाही. त्या धक्क्यातून ते बाहेरच आले नाहीत. माझ्या इतक्या माणसांनी दगा दिला असं ते सारखं म्हणत राहिले. खाली काय सुरु होतं याचा त्यांना अंदाज आला नाही. हा नेतृत्व कौशल्याचा प्रश्न आहे. भाजपाला थांबवण्यासाठी त्यांनी दुसरा पर्याय दिला असता तर आम्ही मान्य केला असता,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान नव्या मंत्रिमंडळात संधी मिळाली तर काँग्रेसमधूनही आमदार जाऊ शकतात असं मोठं विधान यावेळी त्यांनी केलं.