आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी २२ जागांवर ठाम असल्याने नक्की किती व कोणत्या जागा सोडायच्या याबाबत काँग्रेसमध्ये विचारविनिमय सुरू झाला आहे. याबाबत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची मते अजमावून घेण्यात येत आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस मधुसूदन मिस्त्री आणि मोहन प्रकाश यांच्यासह अन्य नेत्यांनी राष्ट्रवादीबरोबर आघाडीबाबत मुख्यमंत्री चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रवादीला २२ जागा सोडण्यास काँग्रेसचा विरोध आहे. मात्र २२ जागा लढविणारच हे शरद पवार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आघाडय़ांच्या संदर्भात असलेल्या ए. के. अ‍ॅन्टोनी समितीनेही राष्ट्रवादीबरोबरील आघाडीबाबत नेत्यांकडून मते मागविली आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असून, नक्की कोणत्या व किती जागा सोडायच्या याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.