देशातील सर्वात मोठा समूह पुनर्विकास अशी ओळख असलेल्या भेंडीबाजार पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यातील सेक्टर ४ मधील इमारतींच्या बांधकामाला बुधवारी सुरुवात करण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पायाभरणी करून इमारतींच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याचे काम वेग घेण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>>“या लोकांनी महाराष्ट्राचा बिहार केला”, पत्रकाराच्या हत्येनंतर जयंत पाटील यांची सरकारवर सडकून टीका

दक्षिण मुंबईतील गजबजलेला आणि मोडकळीस आलेल्या इमारतीचा परिसर अशी ओळख असलेल्या भेंडीबाजाराचा कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार भेंडीबाजारातील १६.५ एकर जागेवरील इमारतींचा समूह पुनर्विकासाचे काम सैफी बुर्हाणी अप्लिपमेंट ट्रस्टने हाती घेतले. या प्रकल्पाअंतर्गत तीन हजार निवासी आणि एक हजार २५० अनिवासी गाळ्यांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात राबविला जात असून पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तर आता दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी आवश्यक त्या परवानग्या घेऊन कामाला सुरुवात करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम २०२५ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, हे काम सुरू असतानाच प्रकल्पात अनियमितता असल्याचा, प्रकल्पाच्या आराखड्यात बदल केल्याचा, विकासकाला अधिक क्षेत्रफळ दिल्याचा आरोप करून या प्रकल्पाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने प्रकल्पाचे काम बंद करण्याचे आदेश दिले होते. या नोटीसनंतर सैफी बुर्हाणी ट्रस्टने प्रकल्पाचे काम तात्काळ बंद केले होते.

हेही वाचा >>>मुंबई महानगरपालिकेचा ‘आरोग्यम् कुटुंबम्’ कार्यक्रम; वर्षभरात ४७ टक्के नागरिकांची करणार आरोग्य तपासणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता दुसऱ्या टप्प्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. दाऊदी बोहरा समाजाचे नेते सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात सेक्टर ४ मधील कामास फडणवीस यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले. सेक्टर ४ मध्ये १.५ एकर जागेचा पुनर्विकास केला जाणार आहे. यात १४०० निवासी आणि ३७५ अनिवासी गाळे बांधण्यात येणार आहेत. या परिसरातील मोडकळीस आलेल्या ७४ इमारतींच्या जागी ५३ आणि ५४ मजली दोन बहुमजली इमारती बांधण्यात येणार आहेत. सेक्टर ४ चे काम सुरू झाल्याने आता दुसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग येणार आहे. तर दुसरा टप्पा २०२५ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.