मोबाइल, कॅमेरापासून ते कपडय़ांपर्यंत अनेक गोष्टी तरुणाई ऑनलाइन खरेदी करत असते. कमी वेळात आणि कमी कष्टात जास्तीतजास्त खरेदी करण्याचा उत्तम पर्याय म्हणून ई-कॉमर्स संकेतस्थळांची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. ताज्या आकडेवारीनुसार ५७ टक्के तरुणाई ही खरेदीसाठी पारंपरिक पद्धत न अवलंबता ऑनलाइन शॉपिंगकडे वळली आहे. ग्राहकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन मोबाइल तसेच ई-कॉमर्स कंपन्यांनी दिवाळीनिमित्त जास्तीतजास्त ग्राहक आपल्याकडे यावेत यासाठी हातमिळवणी करण्यास सुरुवात केली आहे.
कंपन्या आणि ई-कॉमर्स संकेतस्थळ एकत्र येऊन ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स देऊ करत आहेत. यामुळे दिवाळीपूर्वी ग्राहकांना स्वस्तात उत्पादने मिळू शकणार आहेत. ऑनलाइन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्पादक कंपन्या संकेतस्थळांवर आपली उत्पादने कशी झळकतील यासाठी प्रयत्नशील असतात. दिवाळीच्या निमित्ताने ही बाब प्रकर्षांने समोर आली असून उत्पादक कंपन्या आणि ई-कॉमर्स संकेतस्थळांनी एकमेकांच्या सहकार्याने ‘एक्सक्लुझिव्ह लाँचेस’ सुरू केले आहेत. म्हणजे अमुक एका कंपनीचे उत्पादन अमुक एका संकेतस्थळावर उपलब्ध होऊ लागले आहे. फ्लिपकार्टने नुकत्याच केलेल्या मेगासेलच्या दिवशी चिनी कंपनी झिओमीने आपला ‘एमआय३’ हा फोन संकेतस्थळावर लाँच केला. पहिल्याच दिवशी त्याची एक लाखांच्या आसपास विक्री झाली. फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या स्पाइस कंपनीचा मोबाइलही नुकताच स्नॅपडील या ई-कॉमर्स संकेतस्थळावर लाँच करण्यात आला. यापाठोपाठ आता आयबेरी या कंपनीने ‘अक्सूस औरा ए१’ हा फोन ईबे या संकेतस्थळाच्या माध्यमातून बाजारात आणला आहे. दिवाळीपर्यंत अशा प्रकारचे आणखी सात ते आठ विशेष लाँचेस होणार असून यातून सर्वाधिक फायदा ग्राहकांना होणार आहे.
 ऑनलाइन शॉपिंगकडे मोठा वर्ग वळला आहे. या वर्गाला आकर्षित करण्यासाठी अनेकदा आमच्यासारख्या कंपन्या खास त्या संकेतस्थळाच्या माध्यमातून एक उत्पादन बाजारात आणते. एखादे उत्पादन ऑनलाइन विकण्यासाठी ई-कॉमर्स संकेतस्थळाला दिला जाणारा मोबदला हा दुकानदाराच्या तुलनेत कमी असल्याने ग्राहकांना त्यातून सवलती दिल्या जातात. याचबरोबर ग्राहकांना संकेतस्थळावर उत्पादनांची तुलना करणेही शक्य असते. यामुळे ऑनलाइन खरेदी करणारा एक मोठा वर्ग आहे. पण कंपनीकडून पारंपरिक

बाजारपेठेकडेही दुर्लक्ष केले जात नाही. ती बाजारपेठही कंपन्यांसाठी तितकीच महत्त्वाची आहे. यामुळे त्या बाजारपेठांमध्येही आकर्षक उत्पादने येत आहेत. संपूर्ण ऑक्टोबर महिन्यातील सणामुळे बाजारपेठेत मोबाइलची विक्री मागील महिन्यांच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे.
– मुरली रेतीनेनी, कार्यकारी संचालक, सेलकॉन मोबाइल्स.

ऑनलाइन शॉपिंगमध्ये ग्राहकांना सर्वाधिक फायदा मिळतो. हा ग्राहक कोणत्याही ठिकाणाहून कोणतीही वस्तू खरेदी करू शकतो. ईबेचे जाळे हे देशातील ४५०० हजार हून अधिक शहरे आणि निमशहरांमध्ये पसरलेले आहेत. हा सर्व ग्राहक एकाच वेळी मिळावा या उद्देशाने कंपन्या ऑनलाइन शॉपिंग संकेतस्थळांकडे वळतात. याचबरोबर या कंपन्यांचे मोबाइल अमुक एका संकेतस्थळावर उपलब्ध आहेत ही माहिती मिळाल्यावर ग्राहक त्या संकेतस्थळाला भेट देतात. ईबे या कंपनीचे उदाहरण घ्यायचे झाले तर या संकेतस्थळावर इलेक्ट्रॉनिक्स, जीवनशैली, माध्यम आणि संग्रह या प्रकारात ‘एक्स्क्लुझिव्ह लाँचेस’ होतात. म्हणजे ग्राहकांना या प्रकारातील नवीन गोष्टी एकाच संकेतस्थळावर एका क्लिकवर पाहता येणे शक्य होतात. यामुळे ग्राहक वारंवार आमच्या संकेतस्थळांना भेट देतात.
विद्यमान नैनी, तंत्रज्ञान प्रमुख, पैसा पे आणि पॉवरशिप विभाग, ईबे इंडिया.