लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : घरगुती ग्राहकांनी छतावर सौरऊर्जा प्रकल्प राबविल्यास शून्य वीजबिल घेऊन वापरापेक्षा अधिक वीज तयार झाल्यास, त्यातूनही उत्पन्न घेण्याच्या ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’च्या संकल्पनेला महावितरणच्या चुकीच्या धोरणांमुळे घरघर लागण्याची शक्यता आहे.

सूर्यघर योजनेची यंत्रणा सुरळीत चालविण्यासाठी महावितरणतर्फे ‘नेट मीटर’ बसविण्यात येतात. आता महावितरण या घरगुती ग्राहकांना ‘स्मार्ट नेट मीटर’ बसवणार आहे. कोणत्या वेळी किती वीज वापरली, हे समजण्यासाठी हे ‘टीओडी’ मीटर असतील. छतावरील सौरऊर्जा अधिनियम (रुफटॉप रेग्युलेशन्स) २०१९ च्या ११.४ (डी) प्रमाणे ‘टीओडी नेट मीटर’ असलेल्या ग्राहकांना दिवसाच्या ज्या काळात (म्हणजे सकाळी ९ ते संध्याकाळी ५) सौर यंत्रणेमधून वीज तयार केली गेली असेल, त्याच काळात वापरलेल्या युनिट्स बरोबर वजाबाकी होईल आणि या काळात जी जास्तीची वीज तयार होईल ती कमी मागणीच्या काळात (ऑफपीक) काळात तयार झालेली वीज म्हणून धरली जाईल.

अर्थातच अधिक मागणीच्या काळामध्ये (पीक अवर्स) त्याची वजाबाकी (सेटऑफ) होणार नाही. सौरवीज दिवसा ९ ते ५ या वेळेतच तयार होते, तर घरगुती ग्राहकांचा वीजवापर प्रामुख्याने सायंकाळी ६ ते सकाळी ९ या वेळेत असतो. त्यामुळे त्याला आता या ‘टीओडी’ (स्मार्ट) मीटरमुळे ‘सेटऑफ’ मिळणार नाही. त्यामुळे शून्य वीजबिलासाठी घराच्या छतावर सौर वीज यंत्रणा बसविल्यामुळे वीजबिल शून्यावर येण्याचे त्याचे स्वप्न भंग पावण्याची शक्यता आहे. परिणामी ग्राहकांचा पंतप्रधान सूर्यघर योजनेला मिळणारा प्रतिसाद कमी होईल, असे पुण्यातील ‘सजग नागरिक मंचा’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले. त्यामुळे वीज ग्राहकांनी महावितरणच्या वीजदरवाढ प्रस्तावाबाबत राज्य वीज नियामक आयोगाच्या संकेतस्थळावर १७ फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…अशी आहे योजना

  • ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’अंतर्गत देशातील एक कोटी घरांवर सौर वीजनिर्मिती प्रणाली बसवून त्या ग्राहकांचे वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ज्या ग्राहकांच्या घरात सूर्यप्रकाशामुळे दिवसभर जेवढे युनिट वीज तयार होईल, ती त्यांनी महावितरणच्या ग्रीडमध्ये टाकायची आणि ग्राहक दिवसरात्र मिळून जेवढे युनिट वीज वापरेल, ती तयार केलेल्या युनिटमधून वजा करून फक्त उर्वरित युनिटचे पैसे भरायचे.
  • तयार वीज वापरलेल्या विजेपेक्षा जास्त असेल तर तेवढे युनिट ग्राहकाच्या खात्यात जमा राहील व ते आर्थिक वर्ष संपेपर्यंत त्या युनिट्सचा वापर तो करू शकेल. वर्षाअखेर जे युनिट्स त्याच्या खात्यात जास्तीचे शिल्लक राहतील, त्याचे महावितरण ग्राहकाला पैसे देईल. ही यंत्रणा सुरळीत राबविण्यासाठी ‘नेट मीटर’ बसविण्यात येतात. आता महावितरण ‘स्मार्ट नेट मीटर’ बसवणार आहे. कोणत्या वेळी किती वीज वापरली, हे समजण्यासाठी हे ‘टीओडी’ मीटर असतील.

…तर बिल भरावेच लागेल

महावितरणने नुकत्याच सादर केलेल्या वीजदरवाढ प्रस्तावात ‘ऑफ पीक अवर्स’ म्हणून सकाळी ९ ते सायंकाळी ५ ही वेळ ठरविली आहे. त्यामुळे या काळातच तयार झालेली सौर वीज त्याच काळात वापरली नाही, तर ती फक्त खात्यात दिसत राहील. वर्षाअखेरीस तेवढ्या युनिट्सच्या ८८ टक्के युनिट्सचे ३/ ३.५० रुपयांप्रमाणे ग्राहकांना पैसे मिळतील. ग्राहक सायंकाळी ६ ते सकाळी ९ या मुख्य वेळेत जी वीज वापरेल त्याचे बिल त्याला भरावेच लागेल.

महावितरणच्या वीजदर निश्चिती प्रस्तावामुळे पंतप्रधान सूर्यघर योजनेला कोणताही धक्का लागणार नाही. घरगुती ग्राहक स्वत:च्या वापरापेक्षा अतिरिक्त वीज छतावरील सौर यंत्रणेतून निर्माण करतील, त्याचे पैसे त्यांना मिळणार आहेत. -विश्वास पाठक, स्वतंत्र संचालक, महावितरण