राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी मोकळ्या सिलिंडर किंवा टँकरमध्ये ऑक्सिजन भरण्याची (रिफिलिंग)आणि वाहतुकीची सुविधा २४ तास सुरू करावी, असे आदेश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑक्सिजनच्या वितरणात येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी उत्पादकांसोबत सोमवारी झालेल्या बैठकीत वाहतूक व्यवस्थेच्या अडचणीमुळे ऑक्सिजनची कुठेही कमतरता होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना उत्पादकांस संबंधित विभागांनी दिल्या.

राज्यात ऑक्सिजनचा साठा मुबलक असला तरी उत्पादक आणि विक्रेते यांच्याकडे वाहतूक व्यवस्था मर्यादित असून यातील ८० टक्के पुणे आणि कोकण विभागात असल्याने वितरणात अडचणी येत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ‘ऑक्सिजनचा पुरेसा साठा, वितरणात अडचणी‘ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत सोमवारी उत्पादकांसह वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभागासोबत मंत्र्यांनी बैठक घेतली.

मोकळ्या सिलिंडर किंवा टँकरमध्ये ऑक्सिजन भरण्याचे काम  मर्यादित वेळत सध्या करण्यात येते. ते चोवीस तास सुरू ठेवण्यात यावे. उत्पादकांकडे असलेल्या मोठय़ा टँकरचा वापरसुद्धा संबंधित विभागाकडून परवानगी घेऊन वैद्यकीय ऑक्सिजन किंवा द्रवरूप ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी करण्यात यावा. लिंड आणि आयनॉक्स या उत्पादकांच्या नियमावलीनुसार रात्री बारा ते पाच या कालावधीत वाहतूक करण्यात येऊ नये,असे निर्देश आहेत. मात्र आपत्कालीन गरज विचारात घेऊन दोन चालकांसह वाहतूक व्यवस्था २४ तास करण्यात यावी. द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा  करताना संबंधितांशी संवाद साधून वाहन पोहोचल्यानंतर लगेच तात्काळ रिकामे करून लगेचच परत जाईल अशी व्यवस्था करण्यात यावी. उत्पादकाने भाडेतत्वावर वाहन किंवा टँकर घेऊन इतर उत्पादकांकडे असलेला साठा घेऊन रिफिलिंग स्टेशन किंवा रुग्णालयात देता येईल याची व्यवस्था करावी. राज्यातील ऑक्सिजन टँकर व्यतिरिक्त जवळच्या इतर राज्यातून सुध्दा ऑक्सिजनचे टँकर प्राप्त करुन राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा. इतर गॅसेसचे टँकर सुध्दा ऑक्सिजन वाहतूकीसाठी कशा प्रकारे वापरता येईल याचीही शक्यता पडताळण्याचे निर्देश देण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Continue oxygen filling and transport 24 hours a day abn
First published on: 15-09-2020 at 00:30 IST