राज्यात ‘अंतरा’ कार्यक्रमाला वाढता प्रतिसाद

‘अंतरा’ कार्यक्रमांतर्गत मोफत दिल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक इंजेक्शनच्या वापराला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी एप्रिल आणि मे दोन महिन्यातच ३ हजार ४३३ स्त्रियांनी याचा फायदा घेतला आहे. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ मध्ये १० हजार ४९१ स्त्रियांनी ‘अंतरा’चा वापर केला. राज्यातील सर्व प्राथमिक केंद्रावर ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. मुंबईत या पर्यायाला सर्वाधिक पसंती दर्शविली आहे.

गर्भनिरोधक म्हणून तांबी, निरोध, गोळ्या इत्यादी अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. कुटुंब नियोजन विभागाकडून अंतरा कार्यक्रमाअंतर्गत मोफत गर्भनिरोधक इंजेक्शनचा पर्याय २०१७ साली खुला करण्यात आला. ‘अंतरा’ कार्यक्रम राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. जुलै २०१७ साली राज्यातील २० वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयांमध्ये हा कार्यक्रम सुरू झाला. २०१८ मध्ये जिल्हा रुग्णालयांनाही यात सहभागी करून घेतले गेले.

म्रेडोक्सीप्रोजेस्ट्रॉन एसीटेट(एमपी) या गर्भनिरोधक इंजेक्शनचा प्रभाव तीन महिन्यांपर्यंतच राहतो. त्यामुळे दर तीन महिन्यांनी ते घ्यावे लागते. सर्व साधारणपणे १८ ते ४५ वयोगटातील महिलांना हे इंजेक्शन दिले जाते. पाळी आल्यानंतर, गर्भपातानंतर सात दिवसांनी आणि प्रसूतीच्या सहा आठवडय़ानंतर हे इंजेक्शन घेता येऊ शकते. इंजेक्शनचा वापर थांबविल्यानंतर सहा ते सात महिन्यांनी गर्भधारणा होऊ शकते, अशी माहिती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेखा डावर यांनी दिली.

गेल्या वर्षभरात जिल्ह्य़ांमध्ये ६ हजार ६०४ आणि नगरपालिका विभागात ३ हजार ८८७ स्त्रियांनी अंतराचा वापर केला आहे. राज्यभरात अमरावती जिल्ह्य़ांमध्ये सर्वाधिक म्हणजे ६२७ महिलांनी अंतराला पसंती दिल्याचे निदर्शनास येते. त्याखालोखाल बीड(४६१), सोलापूर (४२८), पुणे (३५९), अकोला(३८१) आणि पालघर(२९४) भागामध्ये अंतराचा वापर अधिक केला आहे. तर सिंधुदुर्ग(४३), रत्नागिरी(४५), औरंगाबाद(४०), नागपूर या जिल्ह्य़ांमध्ये मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. यावर्षी हा प्रतिसाद अजूनच वाढला असून दोन महिन्यांत अमरावती(४१८),नाशिक(२२४), नंदुरबार(१८०) या जिल्ह्य़ांमधील सहभाग वाढत आहे.

दोन महिन्यांत ३ हजार महिलांकडून वापर

यावर्षी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांतच ३ हजार ४३३ स्त्रियांनी याचा फायदा घेतला आहे. ‘अंतरा’ला सर्वाधिक प्रतिसाद मुंबईमध्ये मिळत आहे. गेल्या वर्षी मुंबईत ३ हजार ०११ स्त्रियांनी ‘अंतरा’चा मार्ग अवलंबिला आहे. गेल्या दोन महिन्यांत ३६५ महिलांनी या इंजेक्शच्या वापराला प्राधान्य दिले आहे.  सध्या वैद्यकीय महाविद्यालये असलेल्या पालिका विभागामध्ये ‘अंतरा’ कार्यान्वित असून पुढील वर्षी सर्व पालिका विभागात कार्यान्वित केला जाईल, असे कुटुंब कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

..तरीही जनजागृती आवश्यक

डिसेंबर २०१८ मध्ये मेळघाटच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर ‘अंतरा’ सुरू केला आहे. त्यामुळेच अमरावती जिल्ह्य़ात ‘अंतरा’चा वापर सर्वात जास्त असल्याचे निदर्शनास येत आहे. मेळघाटमध्ये याला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी राज्यातील सर्व आरोग्य केंद्रावर हे इंजेक्शन मोफत उपलब्ध होईल. आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी दोन मुलांमध्ये किमान तीन वर्षांचे अंतर असणे गरजेचे आहे. या विविध पर्यायांचा वापर वाढल्यास राज्यभरात होणारे मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखणे शक्य होईल. याबाबत अधिक जनजागृती  अत्यावश्यक असल्याचे आरोग्य संचलनालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.