मुंबई : कूपर रुग्णालयामध्ये रुग्ण सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराच्या कंत्राटाला मुदतवाढ वा नवे कंत्राट न दिल्याने रुग्णालयातील विविध विभागांमध्ये मनुष्यबळाची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून रुग्णालयातील रुग्ण सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. क्ष किरण विभाग, फार्मासिस्ट, ड्रेसर, रुग्ण नोंदणी कर्मचारी यांच्याबरोबरच वैद्यकीय अधिकारी व सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांचे कंत्राट संपुष्टात आले आहे. परिणामी, रुग्णांना नोंदणी करणे, डॉक्टरांकडून तपासणी करणे, त्याचबरोबर अन्य तपासण्या करण्यासाठी तासन््तास रांगेत ताटकळत राहावे लागत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये बहुतांश सेवा पुरविण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. कूपर रुग्णालयामध्ये मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट ऑगस्टमध्ये संपुष्टात आले. परंतु वैद्यकीय अधिकारी व सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, क्ष किरण विभाग, फार्मासिस्ट, ड्रेसर, रुग्ण नोंदणी कर्मचारी यांच्या नियुक्तीसंदर्भातील नवीन कंत्राट देण्याकडे रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्ष केले. कंत्राटदाराच्या कंत्राटाची मुदत संपुष्टात आल्याने सोमवारपासून रुग्णालयातील वैद्यकीय सेवा विस्कळीत झाली आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना नोंदणीसाठी जवळपास दीड ते दोन तास रांगेत उभे राहावे लागत आहे. क्ष किरण विभागामध्ये तज्ज्ञांच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांना ताटकळावे लागत आहे. कंत्राट संपुष्टात आल्याने मलमपट्टी करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे जखमी अवस्थेत येणाऱ्या रुग्णांना मलमपट्टी शिवायच घरी जावे लागत आहे. त्याप्रमाणे फार्मासिस्टच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांना औषधे घेण्यासाठी तासन््तास रांगेत उभे राहावे लागत असून रुग्णांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

रुग्णालयातील डॉक्टरांचे अधिष्ठातांना पत्र

कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आल्याने विविध विभागांमध्ये मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्ण सेवेवर परिणाम होऊन रुग्णांची गर्दी वाढत आहे. कंत्राटाला तातडीने मुदतवाढ वा नवे कंत्राट न दिल्यास रुग्ण सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. अशा आशयाचे पत्र रुग्णालयातील डॉक्टरांनी अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांना पाठवले आहे.

अपंगत्व प्रमाणपत्र केंद्र बंद करण्याची विनंती

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अपंगत्व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येणाऱ्यांची नोंदणी करणे अशक्य होत आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये असलेले अपंगत्व प्रमाणपत्र केंद्र तात्पुरते बंद करावे, अशी विनंती विभागाने कूपर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना केली आहे.

रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये यासाठी करायच्या उपाययोजनांबाबत बुधवारी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे. कंत्राटदाराला मुदतवाढ देण्याबाबत विचार करण्यात येईल. ही सर्व नॉन शेड्यूल्ड पदे असल्याने ती भरण्याच्या प्रक्रियेसाठी साधारण दोन महिने लागण्याची शक्यता आहे. रुग्णालय प्रशासनाकडून सादर केलेल्या प्रस्तावामधील चुका सुधारून तो नव्याने सादर केला आहे. – डॉ. नीलम अंद्राडे, अधिष्ठाता, कूपर रुग्णालय