मूळ भाषण दाखवलेच नाही; विक्रम गोखले यांचे टीकेला पत्रकार परिषदेतून उत्तर

मुंबई : माझ्या ७६व्या वाढिदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मी केलेले मूळ भाषण प्रसारमाध्यमांनी दाखवलेच नाही. उलट मी मांडलेल्या मतांचा विपर्यास करण्यात आला, असा आरोप करून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी प्रसारमाध्यमांना लक्ष्य केले. अभिनेत्री कंगना राणावतच्या विधानांचे समर्थन केल्याप्रकरणी गोखले यांच्यावर चहूबाजूंनी होत असलेल्या टीकेला शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी उत्तर दिले.

देशातील परिस्थितीबाबत आपण केलेली विधाने ही आपल्या राजकीय अभ्यासातूनच आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘देश भगवा राहील, हिरवा होणार नाही’ या आपल्या विधानाचे समर्थन करताना, धर्मनिरपेक्षतेवर आपला विश्वास आहे, मात्र खोट्या धर्मनिरपेक्षतेबाबत चीड आहे. धर्म ही संकल्पनाच वाईट आहे, ती बाजूला ठेवून लोकांशी सुसंवाद साधावा अशी अपेक्षा असते. आपल्याकडचे अतिबुद्धिजीवी मात्र खोट्या धर्मनिरपेक्षतेचे अनुसरण करतात,’’ असे गोखले म्हणाले. 

या देशाचे तुकडे व्हावेत, देश एकसंध राहू नये, अशी काही लोकांची इच्छा आहे. देशात साम्यवादी विचारप्रणाली असावी अशीही काहींची सुप्त इच्छा आहे, पण माझा याला विरोध आहे, असे स्पष्ट करतानाच शिवसेना आणि भाजपने एकत्र येणे गरजेचे आहे याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. ‘‘दोन वर्षांपूर्वी आपण सर्वांनी विश्वासाने या पक्षांना निवडून दिले, परंतु आपला विश्वासघात झाला. दोन्ही पक्षांच्या चुका झाल्या आहेत. दोन्ही पक्षांशी मी बोललो आहे, त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे,’’ अशी अपेक्षा गोखले यांनी व्यक्त केली.

आपल्याकडे मतपेट्यांचे राजकारण चालते. राजकीय पक्षांना सत्तेची भूक आहे, काहींना या देशाचे तुकडे व्हायला हवे आहेत, तर काहींना या देशात राहण्याची भीती वाटते, त्यांना सुरक्षित वाटत नाही. ‘आझादी चाहिए वरना तुकडे होंगे’ असे बोलण्याचे धाडसही संसदेत काही जणांकडून होते,’’ अशी टीका त्यांनी केली.

अमेरिकेने ज्यांना व्हिसा नाकारला त्यांचा सन्मान होत आहे हे त्यांना पाहवत नाही. एक

माणूस, एक पक्ष देशासाठी काहीतरी करतो आहे, तो लोकप्रिय होणारच. मग आमचे काय होईल असे वाटून इतर भुंकायला सुरुवात करतात, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या कार्याचे कौतुक केले. आपण ठरावीक लोकांच्या बाजूने बोलतो हा आरोप त्यांनी फेटाळला आणि ज्या राजकीय व्यक्तींमध्ये चांगले गुण आहेत त्यांचेही मी जाहीर  कौतुक करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  वक्तव्यावर ठाम…

‘‘माझी मते मांडण्याचा मला अधिकार आहे आणि मी माझ्या मतांवर ठाम आहे,’’ अशी भूमिका विक्रम गोखले यांनी घेतली. माझी आणि कंगनाची अजिबात ओळख नाही, पण माझा राजकीय अभ्यास दांडगा आहे, असा दावा करून त्यांनी कंगनाने केलेले वक्तव्य योग्य असल्याचा पुनरुच्चार केला. १८ मे २०१४ रोजीचा ‘द गार्डीयन’चा अंक वाचा. जे त्यात म्हटले आहे तेच कंगनाने

सांगितले. ती काहीही चुकीचे बोलली नाही, असे मी म्हटले आणि त्यावरून गदारोळ करण्यात आला. ‘दे दी हमे आझादी बिना ढाल’ म्हणजे विना तलवार आणि ढाल आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले असे म्हटले जाते. मग ज्यांनी

स्वत:चे प्राण दिले, फासावर चढले, ब्रिटिशांवर गोळ्या झाडल्या,  त्यांची यातून अवहेलना झाली,  याची दखल घ्यावीशी वाटत  नाही, असे मूळ भाषणात मी  म्हटले होते, असे गोखले यांनी  स्पष्ट केले.