मुंबई : जगातील नामांकित इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने गेल्या आठवड्यात भारतातील त्यांचे पहिले शो रुम मुंबईत सुरू केले. मात्र, शो रुमवरील देवनागरी लिपीतील टेस्ला हे नाव हिंदीत आहे की मराठीत, यावरून हिंदी – मराठी भाषिकांमध्ये वाद सुरू आहे. संबंधित नाव हिंदीत असल्याचा दावा करणाऱ्या अनेक पोस्ट समाजमाध्यमांवर केल्या जात असून त्यावर मराठी भाषिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
दोन्ही भाषेत नाव सारखेच
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत १५ जुलै रोजी टेस्लाचे शो रुम सुरू करण्यात आले. वांद्रे – कुर्ला संकुलस्थित असलेल्या या शो रुमचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेत, देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे शो रुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर एका बाजूला इंग्रजीत, तर दुसऱ्या बाजूला ठळक देवनागरी लिपीत नाव नमुद करण्यात आले आहे. ते नाव नेमके मराठीत आहे, की हिंदीत यावरून दोन्ही भाषिकांमध्ये वाद सुरू झाला आहे.
समाजमध्यांवरून समज…
महाराष्ट्राच्या भाषिक अस्मितेचा मान राखून टेस्लाने मराठीत फलक लावल्यामुळे मराठी भाषिकांकडून कौतुक केले जात असतानाच संबंधित नाव हिंदीत असल्याचा दावा करणाऱ्या अनेक पोस्ट समाजमाध्यमांवर वायरल झाल्या आहेत. ‘मराठी भाषेवरून वातावरण तापले असतानाच मुंबईत टेस्लाने पहिले शो रुम सुरू केले, ज्याचा नामफलक त्यांनी हिंदीत लावला आहे. याचा नामफलक बदलून दाखवा’, अशा आशयाच्या अनेक पोस्ट केल्या जात आहेत. ‘कालपर्यंत टिळकनगरला जे तिलकनगर लिहायचे, त्यांना आता टेस्ला हिंदीत दिसायला लागल्याची मिश्किल टीका मराठी भाषिकांकडून केली जात आहे. हिंदीचा उदोउदो करणाऱ्यांनो तुमच्या भोजपुरी, मैथिलीसारख्या प्रादेशिक भाषा वाचवा, असा सल्लाही त्यांना दिली जात आहे. टेस्ला हिंदीत असल्याचा दावा करणाऱ्यांनो स्वतःची नावे मराठी, हिंदीत लिहून दाखवा, असेही त्यांना सांगितले जात आहे.
दरम्यान, टेस्ला कंपनीने अधिकृतरित्या शो रुमवरील नामफलक मराठीत असल्याचे स्पष्ट केल्यास भाषिक वादात सापडलेल्या या विषयाला पूर्णविराम मिळाल्याची शक्यता आहे.
मराठी हवी; कायदेशीर नियमच…
नियमानुसार महाराष्ट्रातील सर्व दुकाने, आस्थापनांवर मराठी भाषेतील फलक लावणे अनिवार्य आहे. मराठी मजकूर मोठा आणि ठळक असावा. हा नियम मुंबई महानगरपालिकेसह अन्य महापालिकांमध्ये सक्तीने लागू केला आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेची अस्मिता जोपासली जावी, प्रत्येकाकडून भाषेचा सन्मान केला जावा, यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. मराठी नामफलक नसलेली दुकाने आणि आस्थापनांवर मुंबई महानगरपालिका कठोर कारवाई करीत आहे. परिणामी, दुकानांवर मराठी भाषेत नामफलक लावल्याचे दिसून येत आहे.