भक्ती परब

गणेशोत्सवातील वाढत्या मागणीमुळे दुकानांत चैतन्य

सणाउत्सवात पूजेसाठी लागणाऱ्या तांबा-पितळेच्या भांडय़ांना मान असला तरी इतर धातूच्या भांडय़ांचा स्वस्त आणि मस्त पर्याय उपलब्ध झाल्याने सध्या हा बाजार झाकोळला आहे. गणेशोत्सवात मात्र टाळ, झांजांना मागणी वाढत असल्याने सध्या यांचाच ‘आवाज’ तांब्या-पितळेच्या बाजारात ‘टिपेला’ जात असल्याचे चित्र आहे.

तांब्या-पितळेची पूजेची भांडी नेहमीच्या वापरातून हद्दपार झाली आहेत. वर्षांनुवर्षे निगुतीने जपलेली ही भांडी आता सणा-सुदीला बाहेर काढली जातात. आणि पुन्हा घासून पुसून जपून ठेवली जातात. त्यांची जागा स्टीलच्या आणि इतर प्रकारच्या भांडय़ांनी घेतली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात तांब्या-पितळेची एखाददुसरी वस्तूच खरेदी केली जाते. तरीही सध्या तांबा-पितळेचा बाजार गजबजलेला आहे. याला कारण टाळ आणि झांजांना गणेशोत्सवात वाढणारी मागणी.

गणरायाच्या आगमनाला आठवडा राहिला असताना लालबाग, चिंचपोकळी, करीरोड, चिवडा गल्ली परिसरात पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. गणपतीच्या पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंनी इथला बाजार ओसंडून वाहत आहे. मात्र यातही टाळ, झांजेच्या खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

चिंचपोकळीच्या पुलाजवळील भांडय़ांच्या जुन्या दुकानाचे मालक के. डी. जोदावत यांनी गणेशोत्सवाच्या काळात तांबा-पितळेच्या भांडय़ांची खरेदी वाढत असल्याचे सांगितले. मात्र, पूर्वीच्या मोठमोठय़ा समयांऐवजी मध्यम किंवा छोटय़ा आकाराच्या समयांना मागणी असल्याचे ते म्हणाले. याच रस्त्यावर असलेल्या अश्विन शाह यांच्या दुकानात तांबा-पितळसोबत स्टीलच्या भांडय़ांचीही विक्री करण्यात येते. स्टीलच्या भांडय़ांचे तसेच पूजेच्या भांडय़ांचे दर तांबा, पितळेच्या भांडय़ांच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे ग्राहक खिशाला परवडेल, त्यानुसार खरेदी करतात, असे ते म्हणाले.

लालबागचा राजा आणि इतर मानाच्या गणपतींचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबाग-चिंचपोकळी परिसरात राजेंद्रकुमार अ‍ॅण्ड कंपनी नावाचे प्रसिद्ध दुकान आहे. इथे दक्षिण मुंबई ते मध्य मुंबई परिसरातील ग्राहकांची काशाचे टाळ खरेदीसाठी पावले वळतात. काशाचे टाळ उत्तम नाद देतात. ते वजनानुसार खरेदी केले जातात. यांची किंमत ५०० ते ९०० रुपयांपर्यंत आहे. त्याचबरोबर इतर तांब्या-पितळेच्या वस्तूही इथे मिळतात. पण टाळांसाठीच हे दुकान प्रसिद्ध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणपतीच्या दिवसात पारंपरिक भजन-आरतीमध्ये आजही टाळ-झांजेला महत्त्व असल्यामुळे त्याची मागणी मोठय़ा प्रमाणात असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. इथे खरेदीसाठी आलेल्या गृहिणी एखाद-दुसरे तांब्या-पितळेचे भांडे खरेदी करताना दिसत होत्या. तांब्या-पितळेच्या वस्तू विविध आकारात आणि किमतीत उपलब्ध होत्या. मात्र खरेदीचा कल टाळ आणि झांज ही वाद्ये खरेदीकडे होता.