आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दिलासा
मुंबई : करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू येऊन गेला आहे, असा दिलासा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिला. तसेच मुखपट्टीचा वापर गरजेचाच आहे, असे स्पष्ट केले. करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणावर होती व ती गेल्या काही दिवसांत कमी झाली आहे. आता ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत. पण आता करोना रुग्ण पाच ते सात दिवसांच्या उपचारांनंतर बरे होत आहेत. राज्यात करोनासाठी तयार करण्यात आलेल्या ९५ टक्के रुग्णशय्या अद्याप रिक्त आहेत. अतिदक्षता विभाग, प्राणवायूची गरज असलेले रुग्ण एक टक्का आहेत. बहुतेक रुग्ण गृहविलगीकरणातच बरे होत आहेत. सध्या चिंतेचे फारसे कारण नाही, असे टोपे यांनी सांगितले.
त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी सध्याचे निर्बंध आणखी किती काळ सुरू ठेवायचे, याबाबत कृतीगटाने मार्गदर्शन करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. मुखपट्टीमुक्त महाराष्ट्र असे मी कधीही म्हटले नाही. ब्रिटेन, डेन्मार्क, हॉलंड व अन्य युरोपीय देशांनी मुखपट्टी सक्ती काढली आहे. त्या धर्तीवर आपल्या नियमांमध्येही काही बदल करता येईल का, याविषयी आयसीएमआरकडे विचारणा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे, असे टोपे यांनी स्पष्ट केले. करोनाच्या नवीन प्रकाराची (व्हेरिएंट) चर्चा सध्या सुरू असून हा विषाणू घातक आहे व मृत्युदर ३० टक्के आहे, असे सांगितले जाते. ओमायक्रॉनइतकाच वेगाने त्याचा प्रसार होत असून वटवाघुळापासूनच त्याची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. त्यावर जागतिक आरोग्य संघटना अभ्यास व संशोधन करीत आहे. या विषाणूने बाधित रुग्ण कुठेही आढळलेले नाहीत. त्यामुळे त्याबाबत सध्या काळजी करण्याची आवश्यकता नाही, असे टोपे यांनी नमूद केले.