दिवसभरात मुंबईतील ४९० जणांसह राज्यात १२०१ करोनाबाधित

मुंबई : मुंबईसह राज्यात करोना रुग्णआलेख पुन्हा उंचावला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईतील ४९० जणांसह राज्यात १२०१ नव्या रुग्णांची नोंद झाली. जवळपास महिन्याभराने राज्याच्या दैनंदिन रुग्णसंख्येने हजारचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईतील रुग्णसंख्येने ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच ४०० चा टप्पा पार केला.

राज्यात गेल्या २४ तासांत करोनाच्या ८ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात ९५३ रुग्ण करोनामुक्त झाले असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या ७,३५० वर पोहोचली आहे. राज्यात आठवड्यापूर्वी उपचाराधीन रुग्णांची संख्या ६ हजार ५०७ होती. त्यात लक्षणीय भर पडली आहे.

मुंबईत ऑक्टोबरमध्ये दैनंदिन सुमारे चारशे ते साडेचारशे रुग्ण आढळत होते. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून त्यात घट होत गेली. नोव्हेंबरमध्ये हे प्रमाण सुमारे दोनशेपर्यत खाली आले होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वर जाऊ लागला. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात दैनंदिन रुग्णांची संख्या अडीचशेवर गेली. बुधवारी तर रुग्णसंख्येने चारशेचाही टप्पा पार केल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

आठवड्याभरात मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या जवळपास ३०० ने वाढली. त्याखालोखाल पुण्यात या आठवड्यात २२७ उपचाराधीन रुग्ण वाढले आहेत. नाशिकमध्येही रुग्णसंख्या वाढत असून, गेल्या आठवड्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत ११२ ने भर पडली. सांगली, सातारा आणि रायगड येथेही रुग्णवाढ नोंदविण्यात आली आहे.

राज्यात चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाणही किंचित वाढले आहे. पुण्यात   बाधितांचे प्रमाण आठवड्याभरात १.६४ टक्क्यांवरून १.७५ टक्क्यांवर गेले. सांगली, सोलापूर, सातारा, नगर आणि नाशिकमधील बाधितांचे प्रमाण एका टक्क्यापेक्षाही कमी होते. ते आता एका टक्क्याहून अधिक झाले आहे.

राज्यात सध्या सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण मुंबईत आहेत. त्यापाठोपाठ पुणे (१९१२), ठाणे (१०३५), नाशिक (४४६) आणि नगर (३५६) या जिल्ह्यांमध्ये उपचाराधीन रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ६५ वर पोहोचली आहे.

सध्या लग्न समारंभ, कौटुंबिक कार्यक्रम वाढले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ दिसत असली तरी बाधितांचे प्रमाण अजून चिंताजनक म्हणण्याइतके नाही. मात्र, चाचण्या आणि लसीकरणावर आणखी भर द्यायला हवा. -डॉ. शशांक जोशी,  सदस्य, करोना कृती दल