ऑनलाइन सांगीतिक कार्यक्रमांना प्रेक्षकांचा नगण्य प्रतिसाद

मुंबई : दरवर्षी गुजराती गाण्यांच्या ठेक्यावर थिरकायला लावणाऱ्या गायक तसेच संगीतकारांची नवरात्र सध्या थंडच जाणार आहे. करोनामुळे राज्य शासनाने गरबा तसेच दांडिया आयोजित करण्यास मनाई केल्याने वाद्यवृंदांच्या कमाईवरच पाणी फिरले आहे. ऑनलाइन सांगीतिक कार्यक्र मांना पुरेसा प्रेक्षकवर्ग आणि प्रयोजकत्व मिळत नसल्याने छोटे-मोठे वाद्यवृदं अशा पद्धतीचे कार्यक्र म करण्यास कचरत आहे.

मुंबई, ठाणे या आसपासच्या परिसरात ४० ते ५० छोटे मोठे ऑर्केस्ट्रा समूह असून ते नवरात्री आणि गणेशोत्सवात सांगीतिक कार्यक्रम करतात. गणेशोत्सवापासून सुरू झालेला या सांगीतिक कार्यक्रमांचा हंगाम दिवाळीपर्यंत असतो. यंदा करोनामुळे महत्त्वाच्या सण समारंभांचा हंगाम गेल्याने छोटय़ा-मोठय़ा संगीतकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. करोनामुळे लोकांच्या एकत्रित जमण्यास मर्यादा आल्याने सांगीतिक कार्यक्रम ऑनलाइन होत आहेत. मात्र तुटपुंजे उत्पन्न आणि प्रेक्षकांचा नगण्य प्रतिसाद यांमुळे संगीतकार चरितार्थासाठी इतर कामे करत आहेत.

दरवर्षी सचिन भांगरे यांच्या रिदमिका ग्रुपअंतर्गत औरंगाबाद, पनवेल आणि ठाणे या तीन ठिकाणी गरब्याचे कार्यक्रम अयोजित केले जातात. ‘गेल्यावर्षी आचारसंहिता आणि यंदा करोनामुळे जास्त गरब्याचे कार्यक्रम होऊ शकले नाही. माझ्याकडे ७० जण काम करतात. छोटय़ा पडद्यावरील विनोदी कार्यक्रमात माझा वाद्यवृंद वाजवतो. करोनामुळे मनुष्यबळ आणि चित्रीकरणावर आलेली मर्यादा यामुळे कमी उत्पन्न मिळत आहे,’ असे त्यांनी सांगितले.

आमच्या संगीत समूहात सात वादक आणि तीन गायक आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांत आमची सर्वात जास्त कमाई होते. यंदा राज्य सरकारने गरबा आयोजित करण्यास मनाई केल्याने आमच्या उत्पन्नावर पाणी फिरले आहे. मार्चमध्ये आमचे पाच कार्यक्रमही रद्द  झाले. सध्या लहान मुलांना ड्रम शिकवतो. त्यावरच माझे घर चालत असल्याचे बिटर्स ग्रुपचे प्रमुख निखिल शहा यांनी सांगितले. प्रायोजकत्व आणि अपुरे मानधन यामुळे मोठे सांगीतिक समूह ऑनलाइन कार्यक्रम करत नाही, अशी माहितीही त्यांनी  दिली.

सांगीतिक कार्यक्रम, राजकीय पक्षांच्या सभा यांना तांत्रिक साहाय्य करणारा बोरिवलीतील आकाश पटेल हा तरुण पोटाची खळगी भरण्यासाठी चालक म्हणून काम करतो. करोनामुळे नवरात्रीत गरबा, दांडिया, गणेशोत्सवात मंडळाचे कार्यक्रम आणि मोठे सोहळे होत नसल्याने सात महिन्यांत कोणीच कामासाठी विचारणा केली नसल्याचे तो सांगतो.

अंध संगीतकारांची बिकट परिस्थिती

करोनामुळे उत्पन्नाचे साधन बंद असल्याने अंध गायक आणि संगीतकारांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे. मुंबईत ‘उडान’ हा अंध संगीतकारांचा ऑर्केस्ट्रा असून ते संपूर्ण देशभरात कार्यक्रम करतात. अमेरिकेमध्ये त्यांचा महिनाभर गाण्याचा कार्यक्रम होता. मात्र तो रद्द झाला. डोळस संगीतकार पडेल ते काम करून आपले पोट भागवतात. मात्र, अंध कलावंतांना कोणीही काम देत नाही, अशी खंत ‘उडान’चे प्रमुख दीपक बेडास यांनी व्यक्त के ली.