कल्याण (पूर्व) भागाला एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, असा आरोप करीत डोंबिवलीतील एमआयडीसी कार्यालयाची गेल्या वर्षी मार्च महिन्यात तोडफोड करणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी व मनसेच्या पाच नगरसेवक व एका पदाधिकाऱ्याला सोमवारी मानपाडा पोलिसांनी अटक करून नंतर सुटका केली.
गेल्या काही महिन्यांपासून कल्याण (पूर्व) भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी गेल्या वर्षी मार्च महिन्यात एमआयडीसी कार्यालयात जाऊन पाणीप्रश्नाबाबत तेथील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्या वेळी कार्यालयाची त्यांनी तोडफोड करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली होती. याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीवरून नगरसेवक विशाल पावशे, शरद पावशे, नरेंद्र गुप्ते, कल्याण धुमाळ, नीलेश शिंदे व राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रशांत काळे यांना अटक करून त्यांची न्यायालयात सुटका करण्यात आली.