मुंबई : एका पावसासात मुंबई तर बुडालीच पण मेट्रो भुयारी मार्गत पाणी शिरल्याने भ्रष्टाचार उघडा पडला, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या अवस्थेवरून सरकारला धारेवर धरले आहे. काँग्रेसकडूनही सरकारला लक्ष्य करण्यात आले आहे.
पहिल्याच पावसात मुंबईच्या झालेल्या अवस्थेवरून उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. तीन वर्षे मुंबई महापालिका भाजप आणि मिंधे टोळीच्या हातात आहेत. जनतेच्या पैशाची या काळात फक्त लूट झाली, त्याचा समाचार घेऊच असा सरकारला इशारा देताना रस्त्यावर उतरा आणि लोकांना मदतीचा हात द्या, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.
‘२५ वर्ष मुंबईत कोण होते हे जनतेला माहितेय’
ठाणे : आपत्तीच्या काळात नागरिकांची गैरसोय झाली. आम्हाला प्रथम नागरिकांना मदत करायची आहे. कोणाच्या आरोपाला उत्तर द्यायचे नाही. राजकारण करणाऱ्यांनी राजकारण करावे. मागील २५ वर्ष मुंबईत कोण होते हे लोकांना माहित आहे. मला त्यांच्यावर भाष्य करायचे नाही अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी सांयकाळी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन तेथील कामाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोणतीही परिस्थिती उद्भवली, तक्रार आली तर कमीत कमीत वेळेत प्रतिसाद देऊन यंत्रणांनी मदतीसाठी तत्पर असावे, असे निर्देश शिंदे यांनी दिले
‘मुंबईकरांचा पैसा नगरसेवक फोडण्यासाठी वापरला’
शिवसेना (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी येथील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकात झालेल्या दुरवस्थेची पाहणी केली. त्याचप्रमाणे हिंदमाता येथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. गेले दोन महीने आम्ही सातत्याने सांगत आहोत की नालेसफाई नीट झालेली नाही. पालिकेचा खाल्लेला पैसा माजी नगरसेवकांना फोडण्यात, पदाधिकारी विकत घेण्यासाठी वापरला जात आहे. हा मुंबईकरांचा पैसा आहे, असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकात (भुयारी) पावसाचे पाणी साचले आहे. स्वत:ला ‘इन्फ्रामॅन’ असे म्हणवून घेणारे, व्हिजनरी म्हणणारे, ग्रीन कार्पेट अंथरून नालेसफाईची पाहणी करणारे कुठे आहेत, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
‘मुंबईच्या रस्त्यावर भ्रष्टाचाराची गटारगंगा’
मुंबईतील पहिल्याच मोठ्या पावसात रस्त्यावर राज्य सरकार आणि महापालिकेतील प्रशासनराजच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहिल्याचे चित्र दिसले, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. जनतेचा पैशावर कंत्राटदार आणि सत्ताधारी यांनी डल्ला मारून खिसे भरल्यानेच मुंबईकरांचे पावासाने हाल होत आहेत. ठिकठिकाणी पाणी साचून मुंबई तुंबली आहे. रस्ते, गृहनिर्माण सोसायट्या, रेल्वे ट्रॅक, भुयारी मेट्रो स्थानके, रुग्णालये जलमय झाली आहेत. एका पावसाने भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. यांचे कर्तृत्व इतके महान आहे की आगामी निवडणुकीत लोकांची मते मागायला यांना बोटीनेच घरोघरी जावे लागेल, असा टोला सपकाळ यांनी लगावला.