मुंबई : सात वर्षांपूर्वी एक आयएएस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याच्या आरोपाप्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने माजी आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांना मंगळवारी दोषी ठरवले व त्यांना तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. आमदार असल्याने त्यांना मारहाण करण्याचा परवाना मिळाला नाही, अशी टिप्पणीही विशेष न्यायालयाने त्यांना आरोपांत दोषी ठरवताना केली.

कडू यांच्या शिक्षेला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी तूर्त स्थगिती दिली असली आणि त्यांना जामीन मंजूर केला असला तरी त्यांनी केलेल्या कृतीबद्दल कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

निःसंशयपणे, एखाद्या विशिष्ट विभागाच्या कारभाराबद्दल किंवा व्यवस्थापनाबद्दल किंवा सरकारच्या भरती प्रक्रियेदरम्यान परीक्षा घेण्याबद्दल तक्रारी असू शकतात. परंतु कोणताही लोकप्रतिनिधी अशा अधिकाऱ्याकडे जाईल आणि त्याच्यावर हिंसक हल्ला करेल, अधिकाऱ्याला धमकावेल आणि त्याचे काम विस्कळीत करेल असा त्याचा अर्थ होत नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने कडू यांना दोषी ठरवताना नोंदवले. आरोपी केवळ विद्यमान आमदार आहे म्हणून त्यांना, तक्रारदाराला धमकावण्याचा किंवा त्याच्या कार्यालयात हल्ला करून त्याला कर्तव्य बजावण्यापासून रोखण्याचा कोणताही अधिकार नव्हता, असे देखील न्यायालयाने निकालात नमूद केले.

न्यायालयाचे म्हणणे…

आपण तक्रारदार आयएएस अधिकाऱ्याला मारहाण केली नव्हती, तर केवळ आयपॅड उगारला होता, असा दावा कडू यांनी केला होता. न्यायालयाने हा दावा फेटाळला. तसेच, धमकीचा हावभाव गुन्हेगारी बळाचा वापर होण्याची भीती निर्माण करण्यासाठी पुरेसा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

आरोपी खरोखरच तक्रार सोडवू इच्छित असले तरी, त्यांचा दृष्टिकोन अयोग्य होता. एखाद्या सार्वजनिक सेवकाच्या जीवाला किंवा प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याची धमकी देता येत नाही, असेही न्यायालयाने म्हटले.

कडू हे तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधू शकले असते. ते विद्यमान आमदार होते. त्यांच्यासाठी अनेक मार्ग खुले होते. ते थेट मुख्यमंत्र्यांमार्फतही आपली तक्रार मांडू शकले असते. तथापि, कडू यांनी योग्य आणि कायदेशीर मार्ग निवडण्याऐवजी, तक्रारदार आयएएस अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन अयोग्य पद्धतीने हल्ला केला, त्यामुळे, केवळ अधिकाऱ्याचीच नव्हे तर सरकारचीही प्रतिमा मलीन झाली.

प्रकरण काय ?

कडू हे २६ सप्टेंबर २०१८ महाराष्ट्र माहिती-तंत्रज्ञान महामंडळाच्या मेगा भरतीबद्दल चर्चा करण्यासाठी मुंबईतील माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे तत्कालीन संचालक आयएएस अधिकारी प्रदीप पी यांच्या कार्यालयात गेले होते. प्रदीप यांच्याशी चर्चेदरम्यान वाद वाढला आणि कडू आक्रमक झाले. त्यांनी अधिकाऱ्याच्या टेबलावरून एक आयपॅड उचलला आणि त्यांना मारहाण करण्याचा इशारा केला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी आयएएस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.