मुंबई :वीस वर्षांपूर्वीच्या शस्त्रसाठा प्रकरणात कुख्यात गुंड छोटा राजन याला जामीन देण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला. राजनवरील गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून या प्रकरणात तो जामीन मिळण्यासाठी पात्र नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळताना नमूद केले. पुरावे नसतानाही आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आले आहे आणि २०१५ मध्ये अटक झाल्यापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे, शिवाय, खटल्याला विलंब झाल्याचा दावाही राजन याने जामिनाची मागणी करताना केला होता. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी राजन याचा हा दावा फेटाळला. राजनवरील आरोप गंभीर स्वरूपाचा आहे. तसेच, या प्रकरणी सरकारी वकिलांनी एकूण ४५ साक्षीदार तपासले असून खटला लवकरच पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली आहे, असेही न्यायालयाने राजन याचा जामीन अर्ज फेटाळताना स्पष्ट केले.

संघटित गुन्हेगारीचा भाग म्हणून राजन याच्या साथीदारांनी आणलेले ३४ रिव्हॉल्व्हर, तीन पिस्तूल, एक सायलेन्सर आणि १२८३ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा पोलिसांनी २००५ मध्ये जप्त केला होता. हा शस्त्रसाठा राजन याचा जवळचा साथीदार भरत नेपाळी याने आयात केला होता, असा पोलिसांचा आरोप आहे. राजन याच्यावर भारतीय दंड संहिता, शस्त्रास्त्र कायदा, सीमाशुल्क कायदा आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत खटला चालवण्यात येत आहे. राजन सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात बंदिस्त आहे.