मुंबईतल्या मर्यादित लसीकरण केंद्रांवर आज केवळ तीन तास करोना प्रतिबंध लसीकरण होणार आहे. याबद्दल एएनआयने माहिती दिली आहे. कोविशिल्ड लस ही केवळ ४५ वर्षे वयोगटाच्या वरील नागरिकांनाच, तर कोवॅक्सिन फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांनाच मिळणार असल्याचंही कळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईमध्ये आज दुपारी २ ते संध्याकाळी ५ या वेळेतच लसीकरण केलं जाणार आहे. सर्व केंद्रांवर लसीकरण चालू राहणार नाही. काही केंद्रं बंद राहतील तर काही केंद्रांवर लसीकरण सुरु राहील. त्याचबरोबर कोवॅक्सिन लस केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांनाच दिली जाईल. तर कोविशिल्ड ही फक्त ४५ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना दिली जाणार आहे. मुंबईतल्या काही केंद्रांवर १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण दुपारी २ ते संध्याकाळी ५ या वेळेतच सुरु राहणार आहे.


हेही वाचा- पालिकेकडे लशींचा खडखडाट

लसीकरणाचे नवे धोरण लागू झाल्यापासून केंद्राकडून मोठय़ा प्रमाणात साठा प्राप्त होत असल्याने मुंबईलाही जूनच्या शेवटच्या आठवडय़ात लशींचा पुरेसा साठा मिळाला होता. परिणामी पालिकेच्या केंद्रांवर प्रतिदिन लसीकरणाची संख्या २० ते ३० हजारांवरून अगदी ८० ते ९० हजारांपर्यंत गेली. परंतु मागील चार दिवसांपासून पुन्हा लशींचा तुटवडा निर्माण झाल्याने बुधवारी पालिकेच्या केंद्रांवर केवळ २५ हजार जणांचे लसीकरण होऊ शकले. पालिकेच्या लसीकरण केंद्रांतील साठा बुधवारी पूर्णच संपल्याने अखेर गुरुवारी लसीकरण बंद ठेवण्याची वेळ पालिकेवर आली.

शहरात कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक नागरिकांचे ८४ दिवस पूर्ण झाल्यामुळे त्यांची लस घेण्यासाठी गर्दी होत आहे. परंतु लशींचा साठाच पुरेसा नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना लस मिळू शकलेली नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid vaccination will take place only for 3 hours at a limited number of its centres in mumbai today vsk
First published on: 02-07-2021 at 08:14 IST