मुंबई : स्वस्तात अमेरिकन डॉलर देण्याच्या बदल्यात कोरे कागद देऊन फसवणार्या त्रिकुटाला गुन्हे शाखा १२ च्या पथकाने अटक केली आहे. विरार मधील एका व्यावसायिकाची ६ लाखांची फसवणूक करून ते मागील ११ महिन्यांपासून फरार होते. तक्रारदार भावेश गुणवंतलाल बारोट हे विरार येथे राहतात. त्यांचे अंबिका ट्रेडर्स नावाचे एक विद्युत वस्तूंचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाजवळ आंब्याची विक्री करणार्या अब्दुल सईद याने त्याचा एक मित्र फैजुल स्वस्तात अमेरिकन डॉलर देत असल्याची माहिती दिली. त्यानुसार बारोट यांनी कांदिवली येथे भेट घेऊन खात्री केली.
६ जून २०२४ रोजी भावेश बारोट हे कांदिवली येथे सहा लाख रुपये घेऊन आले होते. या ६ लाखांच्या मोबदल्यात फैजुल शेख त्यांना स्वस्तात अमेरिकन डॉलर देणार होता. त्यावेळी फैजुल याच्यासोबत आलेल्या दोघांनी त्याला डॉलरचे एक बंडल दिले. ते व्यवस्थित गुंडाळून देण्यात आले होते. स्वस्तात अमेरिकन डॉलर मिळाल्याने बारोट आनंदात होते. परंतु नंतर त्यांचा भ्रमनिरास झाला. घरी येऊन त्यांनी ते बंडल उघडले असता वर अमेरिकन डॉलर होते आणि आत कोरे कागद होते. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच बारोट यांनी समतानगर पोलिसात धाव घेतली होती. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता.
गुन्हे शाखा १२ चे पथक या त्रिकुटाच्या मागावर होते. सीसीटीव्ही कॅमेरे, सीडीआर आणि अन्य तांत्रिक तपास सुरू होता. दरम्यान, असाच एक गुन्हा करण्यासाठी हे त्रिकुट कांदीवली येथे येणार असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून अमेरिकन डॉलर, रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. आरोपी मूळचे झारखंड येथील आहेत.
गुन्हे शाखा १२ च्या पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरिक्षक बाळासाहेब राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रासकर, संतोष राणे, बाळकृष्ण लिम्हण, संतोष बने, अमोल राणे, प्रसाद गोरुले. चंद्रकांत शिरसाट, सावंत, विपुल ढाके आदींच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपी सध्या समता नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत आहेत. या तिघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांनी अशाच प्रकारे इतर फसवणुकीचे गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती समता नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली.