पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला आव्हान दिलं होतं. काय उखडायचं ते उखडा, बघू कोणात किती दम आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. यावेळी बोलताना किरीट सोमय्या यांना अटक करावी अशी मागणी, संजय राऊत यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सध्या पवार कुटुंबियांवर धाडी पडत आहे असे त्यांनी मला सांगितले. त्यांचे प्रकरण सुद्धा सोपे नाही आम्ही त्यांनासुद्धा टाईट करु. मी माहिती घेतल्यानंतर शरद पवारांच्या कुटुंबियांवर सातत्याने धाडी पडू लागल्या. ईडीचे लोक त्यांच्या मुलींच्या बहिणीच्या घरात आठ दिवस ठाण मांडून बसले होते आणि तिथेही त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. मी त्यांना आम्ही प्रतिकार करु असे सांगितले. तेव्हा त्यांनी मला आम्ही केंद्रीय पोलीस बल आणून सगळ्यांना थंड करु असे म्हटले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता माझ्यावर आणि माझ्या आसपासच्या लोकांवर ईडीच्या धाडी पडायला सुरुवात झाली. धाड पडण्याआधी तो मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांना अटक होणार आहे असे सांगतो. ईडीचे लोक त्यांच्या घरी पोहोचणार आहेत असे सांगतो. हा काय प्रकार आहे?,” असे संजय राऊत म्हणाले.

“तुमचे सरकार महाराष्ट्रात आले नाही म्हणून तुम्ही केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन आम्हाला त्रास देता. तुम्हाला वाटतं आम्ही तुमच्यासमोर झुकू. गुढघे टेकण्याचे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले नाही. तुम्ही काहीही करा हे सरकार पडणार नाही असे ज्या ज्यावेळी त्यांना सांगत राहिलो त्या त्या वेळी माझ्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या घरी छापे पडत गेले,” असे संजय राऊत यांनी म्हटले.

“पीएमसी बँक घोटाळ्याचा सोमय्यांकडून पुन्हा पुन्हा उल्लेख केला. त्यातला मुख्य आरोपी राकेश वाधवानशी आमचे संबंध असल्याचे सांगितले. राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपाच्या खात्यात वीस कोटी गेले, पक्ष निधीच्या नावावर. मला सांगा निकॉन इन्फ्रा कंपनी कोणाची आहे? ती किरीट सोमय्यांची आहे. किरीट सोमय्या राकेश वाधवानचे भागीदार आहेत. किरीट सोमय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन घेतली. वसईत लाडानीच्या नावावर ही चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटीला घेतली. निकॉन फेजला पर्यावरण विभागाची मंजुरी नाही. राष्ट्रीय हरित लवादाने कारवाई केली तर दोनशे कोटी रुपयांचा दंड होईल. माझे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आवाहन आहे की त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. तसेच पीएमसी बॅंक घोटाळ्यामध्ये किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना अटक करण्यात यावी,” असे संजय राऊत म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criticism of shivsena sanjay raut on bjp kirit somaiya abn
First published on: 15-02-2022 at 17:12 IST