राजकारण हा पैशाचा (खरे तर काळ्या पैशाचा) खेळ. तेथे पाहिजे (श्रीमंत) जातीचे, हे म्हणणे पुन्हा एकदा खरे ठरविणारी अशी आकडेवारी जाहीर झाली आहे. ती आहे उद्या, रविवारी राज्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या मालमत्तेची. या आकडेवारीनुसार, साताऱ्यातील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार या निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांचे नाव वेदांतिकाराजे भोसले. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या त्या पत्नी. त्यांनी जाहीर केल्यानुसार त्यांची संपत्ती आहे ७१ कोटींहून अधिक. दुसऱ्या क्रमांकावर शेकाप तर तिसऱ्या क्रमांकावर पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री आहेत.

‘एडीआर- महाराष्ट्र इलेक्शन वॉच’ या संस्थेने रविवारी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे अहवाल प्रसिद्ध केला आहे. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिका भोसले यांनी ७१ कोटी ७९ लाख रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे अलिबागचे प्रशांत नाईक यांनी ४५ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. तर दोंडाईचा नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुवार रावल यांची मालमत्ता ४३ कोटींपेक्षा जास्त आहे.

सर्वात श्रीमंत उमेदवार प्रशांत नाईक हे शेकापचे भाई जयंत पाटील यांचे मेव्हणे आहेत. सध्या ते नगराध्यक्ष असून पुन्हा नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवीत आहेत. माजी मंत्री गोविंदराव आदिक यांची कन्या अनुराधा या श्रीरामपूरमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असून त्यांची संपत्ती १२ कोटी आहे. माजी आमदार प्रसाद तनपुरे यांच्या पत्नीच्या नावे १४ कोटींची, तर मुलाची सात कोटींची संपत्ती आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पुतण्या संदीप याने शिवसेनेच्या वतीने रोह्य़ाच्या नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. संदीप तटकरे यांची संपत्ती १० कोटींपेक्षा जास्त आहे.

प्रथमच नगरपालिकेसाठी अहवाल

‘एडीआर’ या संस्थेच्या वतीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची संपत्ती, त्यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी यांचा अभ्यास करून अहवाल तयार केला जातो. नगरपालिका निवडणुकीकरिता प्रथमच असे सर्वेक्षण करण्यात आले आहे. वेळेअभावी  सर्व जिल्ह्य़ांतील माहिती गोळा करणे शक्य झाले नाही. महानगरपालिका निवडणुकीतही अशाच पद्धतीने  अहवाल तयार केला जाईल, असे संस्थेचे संस्थापक सदस्य अजित रानडे यांनी सांगितले.

श्रीमंत उमेदवार व त्यांची संपत्ती – अनिता शिरीष चौधरी, अंमळनेर (३८ कोटी), पुष्पा साबळे, खोपोली (४० कोटी), प्रसन्न कुबल, वेंगुर्ले (२८ कोटी), रवींद्र क्षीरसागर, दापोली (२६ कोटी), नसिर पाटील, खोपोली (२४ कोटी), दर्शन बाफना, पेण (२४ कोटी), माधुरी देशमुख, शेगाव (२४ कोटी), अर्चना शिंदे, उरण (२२ कोटी), त्यांचे पती गणेश शिंदे (२२ कोटी), समिना शेख, श्रीरामपूर (२१ कोटी), अंजुम शेख, श्रीरामपूर (२१ कोटी), प्रणिताराजे शिंदे, येवला (२० कोटी).